जातनिहाय जनगणनेवरून पंतप्रधानांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर : ‘जितकी संख्या तितका हक्क’ काँग्रेस
वृत्तसंस्था/ जगदलपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये आयोजित जाहीरसभेत राज्यातील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच बिहारमधील जातीय जनगणनेसंबंधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या नाऱ्यावरही प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने कालपासून एक वेगळा राग आळविण्यास सुरुवात केली आहे. जितकी संख्या तितका हक्क असे काँग्रेस नेते म्हणू लागले आहेत. परंतु या देशात सर्वात मोठी संख्या तर गरीबांची आहे, याचमुळे गरीब कल्याण हाच माझा उद्देश असल्याचे म्हणत मोदींनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेस पक्ष लोकसंख्येच्या हिशेबातून हिस्सेदारीबद्दल बोलत आहे. काँग्रेस हिंदूंना विभागून देशात फूट पाडू पाहत आहे. माझ्यासाठी सर्वात मोठी जात गरीब आहे आणि माझे सरकार गरीबांच्या कल्याणाकरता झटत आहे. मग तो गरीब दलित असो किंवा मागासवर्गीय, गरीबाचे कल्याण झाल्यास देशाचे कल्याण होईल असे उद्गार मोदींनी काढले आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या साधनसामग्रीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा आणि त्यातही विशेषकरून मुस्लिमांचा असल्याचे म्हटले होते. परंतु काँग्रेस आता देशाच्या साधनसामग्रीवर पहिला अधिकार कोणाचा हे लोकसंख्येचे स्वरुप ठरविणार असल्याचे म्हणत आहे. मग काँग्रेस आता अल्पसंख्याकांचे अधिकार कमी करू पाहत आहे का? लोकसंख्येच्या हिशेबाने पहिला अधिकार कोणाचा हे काँग्रेसने स्पष्ट करावे. काँग्रेस आता अल्पसंख्याकांना हटवू पाहत आहे का? सर्वात मोठी संख्या असलेल्या हिंदूंनी स्वत:चे सर्व अधिकार घ्यावेत का? काँग्रेस पक्षाला आता पक्षाचे सदस्य चालवत नाहीत. वरिष्ठ काँग्रेस नेते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. या नेत्यांना कुणीच विचारत नाही. आता काँग्रेसला आउटसोर्स करण्यात आले आहे. देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी केलेले लोक आता काँग्रेस पक्ष चालवित असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
छत्तीसगड आता गुन्ह्यांचे केंद्र
छत्तीसगडला काँग्रेसने आता गुन्ह्यांचे केंद्र करून सोडले आहे. येथे विकास केवळ बॅनर किंवा पोस्टरवर दिसून येतो किंवा काँग्रेस नेत्यांच्या तिजोरीत. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असून जनता आता येथील सरकार बदलण्याचा निश्चय करून आहे. भाजप सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. छत्तीसगडमध्ये विविध समुदाय स्वत:चा हक्क मागत आहेत, परंतु येथील सरकार त्यांना पकडून तुरुंगात डांबत आहे. भाजप सत्तेवर आल्यावर सर्वांना त्यांचा अधिकार मिळणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
काँग्रेसचा एका देशासोबत गुप्त करार
काँग्रेसने आजवर एका देशासोबत गुप्त करार केल्याचा खुलासा केलेला नाही. छत्तीसगडची संपदा लुटणे हाच काँग्रेसचा एकमेव कार्यक्रम आहे. येथील खनिजसंपदा ही काँग्रेसची मालकी नाही. काँग्रेस सरकारकडून नोकऱ्यांमध्ये स्वत:च्या नेत्यांच्या अन् अधिकाऱ्यांच्या मुलांना भरती करण्यात आली. छत्तीसगडमधील गुन्हेगारी आता टोकाला पोहोचली असून छत्तीसगड अन् राजस्थानात सर्वाधिक हत्या कुठे होतात यावरून स्पर्धा सुरु आहे. दोन्ही राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे.