वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर पश्चिम विभागाला विजयासाठी 116 धावांची जरुरी असून त्यांचे पाच गडी खेळावयाचे आहेत. दिवसअखेर पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात 5 बाद 182 धावा जमवल्या होत्या. या सामन्यात दक्षिण विभागाने पश्चिम विभागाला निर्णायक विजयासाठी 298 धावांचे आव्हान दिले होते. हा अंतिम सामना रंगतदार स्थितीत पोहोचला असून दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे.
या सामन्यात दक्षिण विभागाने पहिल्या डावात 213 धावा जमवल्यानंतर पश्चिम विभागाचा पहिला डाव 146 धावात आटोपल्याने दक्षिण विभागाने 67 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दक्षिण विभागाने 7 बाद 181 या धावसंख्येवरून शनिवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 230 धावात आटोपला. दक्षिण विभागाच्या दुसऱ्या डावात अगरवालने 35, कर्णधार हनुमा विहारीने 42, भुईने 37, सचिन बेबीने 28, वॉशिंग्टन सुंदरने 37 तर विशाखने 23 धावा जमवल्या. पश्चिम विभागातर्फे धर्मेंद्रसिंग जडेजाने 40 धावात 5 तर सेट आणि नागवासवाला यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
पश्चिम विभागाने आपल्या दुसऱ्या डावाला सावध सुरुवात केली पण कौशिकच्या अचूक माऱ्यासमोर त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. दरम्यान कर्णधार प्रियांक पांचाळने एकाकी लढत देत दिवसअखेर 11 चौकारासह 92 धावावर तो खेळत आहे. सर्फराज खानने 1 षटकार आणि 5 चौकारासह 48 धावा जमवताना पांचाळसमवेत पाचव्या गड्यासाठी 98 धावांची भागीदारी केली. पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात 5 बाद 182 धावा जमवल्या. पांचाळ 92 धावावर खेळत आहे. दक्षिण विभागातर्फे कौशिकने 28 धावात 3 तर विशाख आणि साई किशोर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण विभाग प. डाव 78.4 षटकात सर्वबाद 213, पश्चिम विभाग प. डाव 51 षटकात सर्वबाद 146, दक्षिण विभाग दु. डाव 81.1 षटकात सर्वबाद 230 (अगरवाल 35, तिलक वर्मा 3, हनुमा विहारी 42, रिकी भुई 37, सचिन बेबी 28, वॉशिंग्टन सुंदर 37, विशाख 23, साई किशोर 16, अवांतर 4, धमेंद्रसिंग जडेजा 5-40, नागवासवाला, अतित सेट प्रत्येकी दोन बळी, चिंतन गजा एक बळी), पश्चिम विभाग दु. डाव 62.3 षटकात 5 बाद 182 (पांचाळ खेळत आहे 92, शॉ 7, देसाई 4, पुजारा 15, सूर्यकुमार यादव 4, सर्फराज खान 48, अवांतर 12, कौशिक 3-28, विशाख आणि साई किशोर प्रत्येकी एक बळी).