काँग्रेस नेते एल्वीस गोम्स यांची मागणी
प्रतिनिधी / पणजी
स्मार्ट सिटीच्या नावाने चाललेली विकासकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची करून सरकारकडून करदात्यांच्या पैशाची खुलेआम लूट होत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. या सर्व प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही पक्षाने केली आहे. गुऊवारी पणजीत काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे नेते एल्विस गोम्स यांनी सुमारे 1140 कोटी ऊपये खर्चाच्या या कामांची आणि एकुणच भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. व्यासपीठावर सरचिटणीस विजय भिके, उत्तर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर आणि पणजीच्या महिला अध्यक्ष लविनिया डिकॉस्ता यांची उपस्थिती होती. या भ्रष्टाचारात ’इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड’च्या सदस्यांचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला.
आश्चर्यकारक प्रकार म्हणजे सरकारपक्षाचेच घटक असलेले महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी स्वत:च सदर कामे दर्जाहीन असल्याचे मान्य केले असल्याने भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे सर्व संबंधितांवर एफआयआर नोंदवला गेला पाहिजे, असे गोम्स म्हणाले. या प्रकल्पाबाबतचे सर्व अधिकार स्मार्ट सिटी मंडळाकडे आहेत. राज्याचे मुख्य दक्षता अधिकारी असलेले मुख्य सचिवच या मंडळाचे अध्यक्ष आहेत. आमदार बाबुश आणि महापौरपदी असलेला त्यांचा सुपूत्र हेही मंडळावर आहे. ते सर्वजण या भ्रष्टाचारात सहभागी आहेत. त्यामुळे सरकार कोणावर कारवाई करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे गोम्स म्हणाले.
नुकतेच गोवा भेटीवर आलेले केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या संदर्भात लोकांना माहिती देण्याचे सोडून, सरकारी मुखपत्रावरून प्रेस नोट जारी केला, हे लज्जास्पद आहे. हा सर्व प्रकार पाहता या भ्रष्टाचारात केंद्रातील अधिकाऱ्यांचाही हात असावा का? असा सवाल निर्माण झाल्याचे गोम्स म्हणाले. दरम्यान, या सर्व कामाची पाहणी करण्यासाठी आणि शहरातील धोकादायक ठिकाणांबद्दल जागरूकता करण्यासाठी काँग्रेसतर्फे ‘पणजी शहर दर्शन’ नावाची सायकल रॅली काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.