वनखात्यासमोर प्रश्न, ‘मिशन बिबटय़ा’ही अयशस्वी
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील 16 दिवसांपासून चकवा देत असलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी शुक्रवारी राबविण्यात आलेली ‘मिशन बिबटय़ा’ शोधमोहीम अयशस्वी झाली आहे. वनखाते आणि पोलीस यंत्रणा 300 कर्मचाऱयांसह रेसकोर्सच्या मैदानात उतरली. मात्र या मोहिमेलादेखील अपयश आले आहे. दरम्यान अनेक ठिकाणी बिबटय़ा नजरेस पडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. रेसकोर्समधील 30 एकराचे क्षेत्र पिंजून काढले तरी हाताला काहीच लागले नाही. त्यामुळे बिबटय़ाचे काय करावे? असा प्रश्नदेखील वनखात्यासमोर पडला आहे.
जाधवनगर परिसरात 5 ऑगस्ट रोजी एका गवंडय़ावर हल्ला करून बिबटय़ाने रेसकोर्स परिसरात आसरा घेतला होता. दरम्यान 14 ट्रप कॅमेरे, 6 पिंजरे, ड्रोन कॅमेऱयांसह वनखाते रेसकोर्सच्या मैदानात उतरले होते. सुरुवातीच्या दोन दिवसांत केवळ एका ड्रोन कॅमेऱयात बिबटय़ाची छबी कैद झाली होती. हा पुरावा वगळता अद्याप वनखात्याच्या हाताला बिबटय़ाबाबत काहीच सापडले नाही. त्यामुळे बिबटय़ा नेमका गेला कुठे? असा प्रश्नदेखील सतावू लागला आहे. तब्बल 16 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतरही बिबटय़ा हाती न लागल्याने वनखाते हैराण झाले आहे. त्यामुळे बिबटय़ाच्या शोधासाठी आता कोणता उपाय हाती घ्यावा, असा प्रश्नही खात्याला पडला आहे.
वनखाते आणि पोलीस खात्याने शुक्रवारी शोधमोहीम अधिक तीव्र केली होती. दरम्यान 300 पोलीस आणि वनखात्याच्या कर्मचाऱयांनी रेसकोर्सच्या मैदानात शोधमोहीम राबविली. मात्र बिबटय़ाचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे वनखाते बिबटय़ाच्या शोधासाठी आता कोणती कारवाई करणार? याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे. येडूरवाडी, बेळगाव, मुडलगी या ठिकाणी बिबटय़ा, भुतरामहट्टीत हरिण, मोदगा येथे तरस तर बेळवट्टीत बिबटय़ा आणि त्यापाठोपाठ शनिवारी बसवन कुडची येथे तरस आढळून आल्याने खळबळ माजली आहे. रेसकोर्स परिसरासह तालुक्मयातील विविध ठिकाणी बिबटय़ा नजरेस पडत असल्याने रेसकोर्समधील आणि विविध ठिकाणी नजरेस पडणारा बिबटय़ा एकच आहे का? हा प्रश्नदेखील आहे.
मुधोळ श्वान रेसकोर्सच्या मैदानात उतरणार का?
बिबटय़ाच्या शोधासाठीची सर्व यंत्रणा कुचकामी ठरली आहे. दरम्यान पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मुधोळ हाऊंड श्वानाचा वापर करावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे आता वनखाते बिबटय़ाला शोधण्यासाठी मुधोळ जातीच्या श्वानाची मदत घेणार का? याकडेही शहरवासियांचे लक्ष लागले आहे. मुधोळ जातीचे श्वान आक्रमक आणि शोध घेण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे मुधोळ श्वान रेसकोर्सच्या मैदानात उतरणार का? हेच पहावे लागणार आहे.
मागील पंधरा दिवसांत जिल्हय़ातील विविध ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. विशेषतः मानवी वस्तीत वन्यप्राणी येऊ लागल्याने जनता भयभीत झाली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी वनखाते कोणते उपाय करणार? याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे. रेसकोर्स परिसरात तब्बल 16 दिवसांपासून दहशत माजविलेल्या बिबटय़ामुळे स्थानिकांसह शहरवासीय हैराण झाले आहेत. त्यामुळे बिबटय़ा कधी सापडतोय? असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. रेसकोर्स परिसरात दबलेल्या बिबटय़ामुळे विश्वेश्वरय्यानगर, हनुमाननगर, टीव्ही सेंटर, जाधवनगर, क्लब रोड आदी परिसर भीतीच्या छायेखालीच वावरताना दिसत आहे. शिवाय रात्रीच्यावेळी बिबटय़ाच्या धास्तीखालीच बाहेर पडावे लागत आहे. मागील 16 दिवसांपासून ही परिस्थिती आहे. त्यामुळे बिबटय़ाचा तातडीने शोध घेऊन त्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
शोधमोहीम सुरूच ठेवणार
मल्लिनाथ कुसनाळ (एसीएफ वनखाते)
बिबटय़ाला शोधण्यासाठी शुक्रवारी ‘मिशन बिबटय़ा’ मोहीम राबविली होती. मात्र बिबटय़ा सापडला नाही. शोधमोहीम सुरूच ठेवणार आहे. रेसकोर्स परिसरात कॅमेरे आणि कर्मचारी बिबटय़ाच्या मागावर आहेत.