लाभार्थी प्रतीक्षेत : गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कागदपत्रे गरजेची : तातडीने वितरण करण्याची मागणी
बेळगाव : मागील वर्षभरापासून अंत्योदय आणि बीपीएल कार्डचे काम ठप्प झाल्याने लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्याने तातडीने नवीन रेशनकार्ड वितरणास प्रारंभ करावा, अशी मागणी लाभार्थ्यांतून होऊ लागली आहे. शासनाने पाच गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी गृहलक्ष्मी योजनेसाठी महिलांची धडपड सुरू झाली आहे. दरम्यान, कागदपत्रांसाठी रेशनकार्ड महत्त्वाचे आहे. मात्र, नवीन रेशनकार्डचे कामबंद असल्याने लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कागदपत्रे गरजेची बनली आहेत. इतर कागदपत्रे मिळत असली तरी रेशनकार्डचे काम ठप्प असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. मध्यंतरी रेशनकार्ड वितरणाला काहीकाळ प्रारंभ झाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा काम ठप्प करण्यात आले आहे. काही धनाढ्या लोकांनीही खोटी कागदपत्रे पुरवून बीपीएल कार्डे मिळविली आहेत. अशांवर आळा घालण्यासाठी सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले आहे.
अर्ज भरण्याच्या कामात अडथळा
विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बेळगाव वन, जनस्नेही केंद्र, जुने तहसीलदार कार्यालय, अन्न व नागरी पुरवठा खाते व सायबर केंद्रांवर नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. सर्रास कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने दिली जात आहेत. त्यामुळे कागदपत्रांसह विविध योजनांच्या पूर्ततेसाठी नागरिकांची धडपड दिसून येत आहे. इतर कागदपत्रे मिळत असली तरी रेशनकार्ड मिळत नसल्याने अर्ज भरण्याच्या कामात अडथळा येऊ लागला आहे.
जिल्ह्यात 85 हजार लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित
एक वर्षापासून नवीन रेशनकार्डचे काम ठप्प झाल्याने जिल्ह्यात 85 हजार लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शिवाय नवीन अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे रेशनकार्डचे काम सुरू होताच कामाचा ताण वाढणार आहे. त्यामुळे किती लाभार्थ्यांना रेशनकार्ड तातडीने मिळणार, हे पहावे लागणार आहे.
पुढील आदेश आल्यानंतरच रेशनकार्डच्या कामाला प्रारंभ होणार
नवीन बीपीएल रेशनकार्डचे काम ठप्प आहे. नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. सध्या ऑनलाईन अर्ज स्वीकृतीदेखील बंद आहे. पुढील आदेश आल्यानंतरच रेशनकार्डच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
– श्रीशैल कंकणवाडी (सहसंचालक, अन्न व नागरी पुरवठा खाते)