कुर्टी खांडेपार पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक : कुर्टी खांडेपार पंचायतीचे 18 कॅमेरे बनले शोभेच्या वस्तू ,ओपा खांडेपार जंक्शन येथील अतिक्रमण हटवा
फोंडा: दीपनगर कुर्टी येथे पंचायतीच्या जागेत बेसुमार डेंगरकापणी व कब्रस्थानच्या भिंतीच्या मुद्दावरून पंचयात मंडळ व नागरीकांमध्ये गरमागरम चर्चा झाली. दीपनगर कुर्टी येथे डोंगरमाथ्यावर 16 हजार चौ. मीटर जागा सर्व धर्मियांसाठी स्मशानभूमी म्हणून आरक्षित केल्यानंतर सरळ डेंगर कापणी का केली ? त्यापुर्वी जमिनीचे कायदेशीरित्या सरकारमान्य सिमांकन करा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. सरपंच संजना नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हवेली कुर्टी येथील सावित्री सभागृहात काल रविवारी ही ग्रामसभा पार पडली. सीसीटीव्हीच्या प्रश्नवार पंचायतीतर्फे मोक्याच्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेले एकूण 25 सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैकी फक्त नाममात्र 7 सीसीटीव्ही कॅमेरे चालत असल्याची माहिती पंचायत मंडळाने दिली. लाखों रूपये खर्चुन संपुर्ण पंचायत क्षेत्रात बसविण्यात आलेले अधिकतम सीसीटीव्ही कॅमेरे शोभेच्या वस्तू बनत आहे. सीसीटीव्ही खरेदी करतानाही अव्वाच्या सव्वा दरात खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आलेला आहे. सीसीटीव्ही बसविताना त्याची डागडुजीही त्याच कंपनीने करणे हा करार न पाळल्याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आल्याची माहिती पंचायत मंडळाने दिली. याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. कुंपण उभारण्यापुर्वी जागेचे सरकारमान्य सिमांकन होणे गरजेचे आहे. सर्व धार्मियासाठी असलेल्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यासाठी कब्रस्तान समितीची फेररचनेसह पंचायतीतर्फे कायदे तयार करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामस्थाच्या सुचनाही ऐकून घेतल्या जाणार असून पुढील ग्रामसभेत मांडण्यात येणार असल्याचे पंचसदस्य हरिष नाईक यांनी सांगितले.
ओपा खांडेपार जंक्शनवर बसथांबा निवारा शेड उभारणे
ओपा खांडेपार येथील अपघातप्रवण जंक्शनवर वाहतूकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवून त्याजागी विद्यार्थी व प्रवशांसाठी निवारा शेड उभारण्याची मागणी यावेळी एकमताने ग्रामस्थांनी केली. त्यानुसार पंचायत मंडळाने ठराव घेतलेला आहे. पंचायतीतर्फे घरोघरी कचरा गोळा करण्याच्या निविदेत मोठा घोळ असल्याचा उपस्थित केलेल्या प्रश्नावर कचरा गोळा करण्यासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. म्हाळशी कुर्टी येथील प्रितेश गावकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर डोंगरकापणी करून घरबांधणीचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. लागूनच असलेल्या वनखात्याच्या जमिनीही बळकावण्याचा धोका संभवत असल्याने त्याकडे गांभीर्याने लक्ष घालणे असे सुचित केले.
कुर्टी व खांडेपार अशा दोन पंचायती करा, मिनी कॅसिनो हटवा
कुर्टी खांडेपार पंचायतीसाठी हाऊसिंग बोर्ड कुर्टी येथे स्वतंत्र पंचायत घर उभारण्यासाठी हालचालींना वेग घेत आहे. याप्रश्नी कुर्टी व खांडेपार अशा दोन पंचायती करण्यात याव्या असा प्रस्ताव ग्रामस्थांनी सुचविला. हवेली कुर्टी येथे पंचायत क्षेत्रात मागील तीन दिवसापासून सुरू करण्यात आलेला मिनी कॅसिनो त्वरीत बंद करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ शंकर नाईक यांनी केली. याबाबत पोलीस खात्याने चौकशीसाठी आदेश देण्यात येणार असल्याची ग्वाही पंचयात मंडळाने दिली. पंचायत स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देताना पंचायत घरोघरी जाऊन कचरा गोळा करते, मान्सनपुर्व कामे प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी उपसरपंच विल्मा पेरेरा, पंचसदस्य मनीष नाईक, हरिष नाईक, निळकंठ नाईक, बाबू च्यारी, अभिजीत गावडे, भिका केरकर हे उपस्थित होते. सचिव सचिन नाईक यांनी मागील सभेचे इतिवृत्त सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत संदीप पारकर, प्रितेश गावकर, शंकर नाईक, जान परेरा, रॉकी फर्नाडीस, गुरूदास खेडेकर व इतर ग्रामस्थांनी सहभाग घेतला.