प्रतिनिधी/ बेळगाव
मातृ भाषेतून किमान प्राथमिक शिक्षण मिळणे हे प्रत्येक मुलाचे मूलभूत प्राथमिक गरज असते. परंतु बेळगाव व खानापूर तालुक्यांमध्ये मराठी शिक्षकांची संख्या कमालीची घटली आहे. नवीन शिक्षक भरती करण्यासाठी सरकारची उदासीनता दिसून येत असल्याने लवकरच मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्णय बुधवारी आयोजित सरकारी शाळा वाचवा या अभियानांतर्गत करण्यात आला.
सरकारी शाळा सुधारणा कमिटी, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांची संयुक्त बैठक नुकतीच मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीमध्ये मातृ भाषेतून शिक्षण देण्याबाबत माहिती देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष मनोहर हुंदरे होते.
प्रारंभी शांताराम (देसूर) यांनी स्वागत केले. संतिबस्तवाड येथील गंगाधर गुरव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कल्लाप्पा पाटील, आण्णाप्पा पाटील, मल्लाप्पा पाटील, प्रमोद रेडेकर, बाबू पाटील, मनोहर संताजी, कृष्णा जंगरुचे, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, युवा नेते शुभम शेळके यांसह इतर उपस्थित होते.