पुणे / वार्ताहर :
खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्याबरोबरच जीवे मारण्याची धमकी देत पत्नीने पतीच्या बँक खात्यातून परस्पर 21 लाख 90 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर पतीला 29 लाख 26 हजार रुपयांचे कर्ज घेण्यास भाग पाडून खंडणी उकळली.
याप्रकरणी, मर्चंट नेव्हीत नोकरीस असलेल्या 35 वर्षीय पतीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पत्नी, तिचा मित्र, आई-वडील आणि भाऊ अशा पाच जणांविरोधात फसवणूक, खंडणी आणि अपहारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पत्नीचे 2022 मध्ये लग्न झाले. तेव्हा पासून ते धानोरी परिसरात वास्तव्यास आहेत. आरोपी पत्नीने लग्नावेळी ती घटस्फोटीत असून तिला एक मुल असल्याची माहिती फिर्यादी पतीपासून लपवली होती. पतीपासून पैसे मिळविण्याच्या हेतूने तिने हे लग्न केले. त्यानंतर मित्र आणि इतरांसोबत संगणमत करून पत्नीने फिर्यादींना त्यांची महत्वाची कागदपत्रे जाळण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर खोटय़ा गुह्यात अडकविण्याबरोबरच जीवे ठार मारण्याची धमकी देत फिर्यादींकडून वेळोवेळी व त्यांच्या बँक खात्यातून परस्पर 21 लाख 90 हजार रुपये आणि त्यांना कर्ज घेण्यास भाग पाडून 29 लाख 26 हजार रुपये तसेच काही मालकी वस्तू ताब्यात घेतल्या. या प्रकारानंतर फिर्यादींनी याबाबत कोर्टात धाव घेतली होती. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.