‘एलिफंट मॅन’ अजय देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजन : हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा
बेळगाव : जीएसएस कॉलेजमध्ये वनस्पती आणि जीवशास्त्र विभागांतर्फे ‘एलिफंट मॅन’ अजय देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाईल्ड लाईफ सप्ताह साजरा करण्यात आला. 16 नोव्हेंबर रोजी या सप्ताहाचे उद्घाटन गोवा येथील अरण्य पर्यावरण संशोधन संस्थेचे डॉ. प्रणॉय बैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून एसकेई सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. एस. वाय. प्रभू उपस्थित होते. प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. अरविंद हलगेकर यांनी स्वागत केले. प्रा. शशांक बोरकर यांनी वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व व अजय देसाई यांचे योगदान याबद्दल माहिती दिली. डॉ. बसवराज गौंडकर यांनी प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा परिचय करून दिला. प्रा. प्रभू यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून आंतरशालेय स्पर्धा खुल्या झाल्याची घोषणा केली. डॉ. प्रणॉय यांनी ‘मुंग्यांचे आश्चर्यकारक जग’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. जैवविविधतेमध्ये मुंग्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर बेळगावमधील सात शाळांमधील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ट्रेझर हंट, मॉडेल मेकिंग, स्पीक फॉर द वाईल्ड, फोटोग्राफी व डॉक्युमेंटरी मेकिंग हे स्पर्धांचे विषय होते. प्रा. प्रवीण पाटील, प्रा. भारती सावंत, प्रा. एस. पी. सांबरेकर, डॉ. प्रसाद देशपांडे, डॉ. पी. टी. हणमगोंड, प्रा. एस. ए. शिंदे, डॉ. वाय. बी. दळवी व प्रा. राहुल सावंत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. याच निमित्ताने डॉक्युमेंटरी स्क्रीनिंग व विद्यार्थी संवाद याचेही आयोजन करण्यात आले होते. वाघांचे राज्य, मुंबईचे टाईड पूल-एक गुप्त जग, जैवविविधता वारसा, कोडगू-जिथे नद्या ताल सेट करतात, असे इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतील माहितीपटही दाखविण्यात आले. त्याचा लाभ 450 विद्यार्थ्यांनी घेतला. समारोप दिवशी मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी ‘मनुष्यप्राणी-संघर्ष : कारणे आणि शमन’ यावर आपले मत मांडले. म्हादई रिसर्च केंद्राचे अध्यक्ष निर्मल कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी ‘वन्यजीव संरक्षणामध्ये तरुणांची भूमिका’ यावर विचार मांडले. अध्यक्षस्थानी एसकेईचे उपाध्यक्ष अशोक शानभाग होते. प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी स्वागत केले. प्रा. शशांक बोरकर यांनी अहवाल सादर केला. डॉ. संतोष जयगौडर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. राहुल सावंत यांनी आभार मानले. पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
ठळकवाडी हायस्कूल अव्वल
या सप्ताहांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये ठळकवाडी हायस्कूलने सर्वाधिक गुण मिळवून सर्वसाधारण अजिंक्यपद पटकाविले. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.