ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दिशा सालियान मृत्यूप्रकरणात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याविरोधात सोमवारी सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.
नाना पटोले म्हणाले, दिशा सालियानच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली होती. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनीच यासंदर्भात सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही चौकशी झाली. त्याचा सविस्तर अहवाल देखील सभागृहात सादर करण्यात आला आहे. तरीही जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करण्यासाठी फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली नसल्याचे सांगत सभागृहाला चुकीची माहिती दिली. शिंदे-फडणवीस यांच्यावरील आरोपांवरील लक्ष विचलीत करण्यासाठी हे प्रकरण उकरून काढलं जात आहे.
अधिक वाचा : कोरेगाव भीमा विजयस्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी
फडणवीस यांनी पदाचा दुरुपयोग करुन सभागृहाला खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्यांच्यावर सोमवारी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, असे नाना पटोले म्हणाले.