पीडीओंच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास होत असल्याचा आरोप
वार्ताहर /अगसगे
अगसगे ग्राम पंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कामामुळे आणि मनमानी कारबाराबद्दल ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे त्यांची तक्रार ग्रामस्थ जिल्हा पंचायतीला निवेदनाद्वारे करणार आहेत. ग्रामविकास अधिकारी एन. ए. मुजावर यांनी जानेवारी महिन्यामध्ये ग्राम पंचायतीमध्ये पीडीओ म्हणून पदभार सांभाळला आहे. मात्र तेव्हापासून गावातील कोणतीच विकासकामे केली नाहीत. तसेच ग्रामस्थांना देखील छोट्या छोट्या कामांसाठी ग्रामपंचायतीचे हेलपाटे मारण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सदर पीडीओ ग्राम पंचायतीला आठवड्यातून दोन ते तीन वेळा येतात. यावेळी एक दोन तासातच पुन्हा काही कारणे सांगून जातात.यामुळे ग्रामस्थानी पीडीओंची वाट पाहत दिवसभर ताटकळत उभे रहावे लागते. याविषयी ग्रामस्थांनी त्यांना प्रश्न करताच थातुरमातुर उत्तरे देण्यात येतात. व त्यांची कामे करून देण्यात येत नाहीत. अशा त्यांच्यावर अनेक तक्रारी आहेत.
निवेदनाची कार्यवाहीच नाही
दलित संघटनेच्यावतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने दि. 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून शेतवडीतील रस्ते करावेत, असे निवेदन दिले होते.. यावेळी आठ-दहा दिवसात रस्ता कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन पीडीओ मुजावर यांनी दिले होते. मात्र अद्याप ती कामे झाली नसल्याने आता शेतकऱ्यांना चिखलात ये-जा करणे भाग पडले आहे. तसेच गावामध्ये पाण्याची टंचाई आहे. काही कूपनलिकाही खराब झाल्या होत्या. याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असता ते ग्राम पंचायत सदस्यांचे काम आहे, अशी उत्तरे ग्रामस्थांना देण्यात आली आहेत. ग्रामविकास अधिकारी यांच्याबद्दल अनेकवेळा तालुका पंचायतीकडे दलित नेत्यांनी तक्रार केली आहे. मात्र तालुका पंचायतीच्या काही अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर आशिर्वाद असल्याने आता थेट जिल्हा पंचायतीकडे त्यांच्या विरोधात दलित संघटना व ग्रामस्थ तक्रार करणार आहेत. अतिवृष्टीमुळे पडलेल्या घरांना राज्य सरकारने घर बांधण्यास पाच लाख तर बसव वसती योजनेमार्फत मंजूर झालेल्या लाभार्थींना एक लाख वीस हजार रुपये मंजूर केले आहे. ही रक्कम चार वेळा टप्प्याटप्प्याने देण्यात येते. यासाठी चारहीवेळा पीडीओ मुजावर यांनी संगणक उतारा व जी. पि. एस.साठी पैशाची मागणी करतात. पैसे दिले तरच फोटो अपलोड करतात. अन्यथा अपलोडच करत नाहीत, अशी तक्रार आहे. या बेजबाबदार व मनमानी पीडीओंच्या विरोधात आता ग्रामस्थ जि. पं. कडे तक्रार करणार आहेत.
भ्रष्टाचाराचा आरोप…
भारतीय सामाजिक परिवर्तन वेदिकेचे सेक्रेटरी व दलित नेते कल्लाप्पा मेत्री यांनी तीन महिण्यापूर्वी माहिती हक्क अधिकाराखाली अर्ज केला आहे. यामध्ये ग्राम पंचायतीला चौदाव्या वित्त आयोगातून व पंधराव्या वित्त आयोगातून किती निधी आला याचा तपशील व किती बैठका झाल्या याचा तपशील मागितला आहे. मात्र त्यांना अद्याप माहिती दिली नाही. यामुळे त्यांनी बेंगळूर येथील मुख्य माहिती कायद्याच्या कार्यालयांना दि. 21 जून रोजी पुन्हा माहिती अधिकारासाठी अर्ज केला आहे. पीडीओ एन. ए. मुजावर हे माहिती देत नसल्यामुळे ग्राम पंचायतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. यामुळेच आम्हाला माहिती देत नसल्याचा आरोप दलित नेते मेत्री यानी केला आहे.