गोगटे सर्कल येथे विद्युत खांब कोसळण्याच्या स्थितीत : त्वरित हटविण्याची आवश्यकता
बेळगाव : हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे मागील दोन महिन्यांमध्ये अनेक निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले. अजून किती नाहक बळी गेल्यानंतर हेस्कॉम प्रशासनाला जाग येणार? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. गोगटे सर्कल येथे काँक्रीटचा विद्युत खांब कोसळण्याच्या स्थितीत असून कोणताही अपघात घडल्यास त्याची जबाबदारी हेस्कॉम घेणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. गोगटे सर्कल येथील रेल्वेच्या जुन्या आरक्षण काऊंटरच्या शेजारी विद्युत खांब उभारण्यात आले होते. परंतु यातील एक खांब मोडला असून तो खाली केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही. गोगटे सर्कल येथे दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. अनेक प्रवासी या विद्युत खांबाशेजारी बसची वाट पाहत थांबलेले असतात. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तो खांब कोसळण्याच्या स्थितीत आहे. हेस्कॉमच्या शहर उपविभाग कार्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर मोडलेला खांब असताना तो कोणालाच दिसत नाही का? हे समजत नाही. केवळ गोगटे सर्कलच नाही तर शहराच्या अनेक भागांमध्ये असे धोकादायक विद्युत खांब आहेत. वास्तविक पाहता ज्या लाईनमनकडे जबाबदारी दिली आहे, त्या भागातील विद्युत खांब, वाहिन्या, ट्रान्सफार्मर यांची दुरुस्ती, त्यांची स्थिती हे पाहणे गरजेचे आहे. परंतु लाईनमन, ज्युनियर इंजिनियर, तसेच सेक्शन ऑफिसरचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडले जात असून, त्यांचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी हेस्कॉमने गोगटे सर्कल येथील विद्युत खांब हटवावा, अशी मागणी केली जात आहे.