मंत्री सतीश जारकीहोळी यांची पत्रकार परिषदेत माहिती : 100 कोटींचे नुकसान
बेळगाव : बुडामध्ये गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी किंवा सीओडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. एक कोटी रुपये किंमत असलेली जागा केवळ 25 लाखांना विक्री करण्यात आली. यामध्ये काहीतरी गैरप्रकार झाला असून त्याची चौकशी केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. सुवर्णसौध येथे विकास आढावा बैठक घेण्यात आली. अधिकाऱ्यांना या बैठकीमध्ये सूचना केल्या. बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बुडासंदर्भातील या गैरप्रकाराची माहिती पत्रकारांना दिली आहे. जवळपास 100 कोटींचे नुकसान झाले आहे. लिलावासाठी दोनवेळा नोटीस काढण्यात आली. मात्र लिलावाला लोकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेच ही मालमत्ता इतक्या कमी रकमेला दिल्याचे सांगितले गेले.
जिल्हा विभाजनाबाबत पाठपुरावा करणार
जिल्हा विभाजनाबाबतही बोलताना जारकीहोळी म्हणाले, बेळगाव जिल्हा हा मोठा जिल्हा आहे. त्यामुळे विभाजन होणे गरजेचे आहे. यापूर्वीही मी मागणी केली आहे. पाठपुरावाही केला आहे. मात्र अद्याप याबाबत निर्णय झाला नाही. यापुढेही जिल्हा विभाजनाबाबत पाठपुरावा केला जाईल. भाजप सरकारने कोणतीच विकासकामे केली नाहीत. रस्त्यांची अवस्था गंभीर बनली आहे. याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे आता ही सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार महांतेश कौजलगी, राजू सेठ आदी उपस्थित होते.