प्रतिनिधी,कोल्हापूर
राज्यातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये चांगल्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनस्तरावर नियोजन करण्यात येत असून यासाठी आवश्यक निधी लवकरच उभा केला जाणार आहे.बँकांकडून कर्ज स्वरुपात मोठ्या प्रमाणात निधी घेऊन उच्च दर्जाच्या सुविधा उभारण्यात येणार आहेत.याअंतर्गत शेंडापार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यासाठी 842 कोटींच्या निधीची तरतूद करणार आहे.यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागेल.तोपर्यंत सीपीआरही अद्ययावत सुविधांनी सुसज्ज करणार असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
मंत्री मुश्रीफ यांनी शनिवारी सीपीआरला भेट देऊन येथील अपघात विभाग,अतिदक्षता विभाग,जनरल वॉर्ड तसेच डायलेसिस विभागाची पाहणी केली.त्यांनतर रुग्णालयातील डॉक्टर,विभाग प्रमुख,अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ.अजय चंदनवाले,जिल्हाधिकारी राहुल रेखावार,अधिष्ठाता डॉ.आरती घोरपडे,जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रीया देशमुख,वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले,सीपीआर कष्टकरी,सर्वसामान्य नागरिकांसाठी आधारवड आहे.पण वेळेत उपचार मिळत नाहीत अशी धारणा सीपीआरबाबत नागरिकांची आहे. हे मत बदलण्यासाठी येथील विविध विभाग अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असायला हवेत.रुग्णांना समाधानकारक सेवा येथील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी पुरवली पाहीजे.शेंडा पार्क येथील रुग्णालयासाठी 842 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.या ठिकाणी वसतीगृह, परिचारिका केंद्र,फॉरेन्सिक लॅब, महिला व पुरुष डॉक्टरांचे स्वतंत्र वसतिगृहाचाही समावेश आहे.त्या ठिकाणी येत्या तीन ते चार वर्षात चांगली इमारत उभी करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.हे काम पूर्ण होईपर्यंत सीपीआरमधील इमारतींची आवश्यक डागडूजी,औषधे व शस्त्रक्रीया साहित्याची कमतरता पडू देणार नाही,असेही त्यांनी सांगितले.
‘ड’ वर्गातील पदे तत्काळ भरा
रुग्णालयातील पदभरती बाबतही त्यांनी शासनाकडील पदे तातडीने भरण्यासाठी संचालकांना सूचना केल्या तसेच जिल्हास्तरावरील ‘ड’ वर्ग पदे भरण्यासाठीही निर्देश दिले.आत्ताच ‘क’ वर्ग भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.त्यातील कर्मच्रायांच्या नेमणुकाही लवकरच होतील असे त्यांनी सांगितले.
प्राध्यापकांच्या 39 जागा रिक्त
सीपीआरमधील प्राध्यापकांच्या 39 जागा रिक्त आहेत.वैद्यकीय शिक्षण घेत असताना सर्वच डॉक्टर स्कॉलरशिप घेतात.मात्र शासकीय दवाखान्यात सेवा देण्यास टाळाटाळ करतात.त्यामुळे त्यांनी सुरवातीचे काहीकाळ शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देण्याबाबत कायदा करण्याचा विचार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवासी व्यवस्था
सीपीआरमध्ये रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी निवासी व्यवस्था नाही.त्यांची गैरसुविधा लक्षात घेता नातेवाईकांसाठी धर्मशाळा उभारण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूर कॅन्सर सेंटर देणार सेवा
सीपीआरमध्ये कॅन्सरवरील उपचाराची सुविधा नाही.पण आता कोल्हापूर कॅन्सर सेंटर आठवड्यातून एक दिवस येथे सेवा देणार आहे.एक दिवस शस्त्रक्रीया आणि एक दिवस तपासणी अशी सेवा देण्यात येणार आहे.तसेच सीपीआरमध्ये गुडघ्यांवरील शस्त्रक्रीयेची सुविधा उपलब्ध नाही.हि सुविधा तत्काळ सुरु करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगतिले.