वृत्तसंस्था/ चेन्नई
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मंगळवारी स्पष्ट केले की, तो आणखी 8 ते 9 महिन्यांत निवृत्तीचा निर्णय घेईल, कारण भविष्याबाबत निर्णय घेण्याची त्याला घाई नाही. धोनीसाठी 2023 हा शेवटचा मोसम ठरू शकतो अशी शक्यता बऱ्याच काळापासून वर्तवली जात आहे.
‘मला माहीत नाही, पण माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी 8-9 महिने आहेत. आताच ती डोकेदुखी कशाला घ्यायची. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे, असे धोनीने ‘सीएसके’ला 10 व्या खेपेला आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचविल्यानंतर बोलताना सांगितले. मी नेहमीच सीएसकेसाठी धावून येईन. मी जानेवारीपासून घराबाहेर आहे, मार्चपासून सराव करत आहे, म्हणून नंतर पाहू, असे तो म्हणाला. 2022 मध्ये नवव्या स्थानावर राहिलेल्या चार वेळच्या विजेत्या चेन्नईने उत्कृष्ट कामगिरी करून गुजरात टायटन्सला पहिल्या पात्रता सामन्यात 15 धावांनी पराभूत करून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुन्हा स्थान मिळविलेले आहे.
मला वाटते की, आयपीएल ही इतकी मोठी स्पर्धा आहे हा आणखी एक अंतिम फेरीतील प्रवेश आहे असे म्हणणे बरोबर ठरणार नाही. यावेळी 10 संघ असल्याने स्पर्धा आणखी कठीण होती. ही दोन महिन्यांहून अधिक मेहनतीची आणि निर्धाराची फलश्रुती आहे. प्रत्येकाने त्यात योगदान दिले आहे. मधल्या फळीला पुरेशी संधी मिळाली नाही, पण आज आम्ही जेथे आहोत ते पाहून खूप आनंद होत आहे, असे धोनी पुढे म्हणाला.
गुजरात टायटन्स हा एक विलक्षण संघ आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे लक्ष्याचा पाठलाग केला. त्यामुळे त्यांना एका मर्यादेत रोखण्याचा विचार होता. पण येथे नाणेफेक गमावणे चांगले ठरले. जर जडेजाला मदत होईल अशी परिस्थिती मिळाली, तर त्याला फटकावणे खूप कठीण होते. त्याच्या गोलंदाजीने खेळ बदलला. मोईनसोबतची त्याची जमलेली विसरू नका, असे धोनीने सांगितले. क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक असलेला धोनी म्हणाला की, मी खूप वेळा त्रासदायक कर्णधार ठरू शकतो. कारण मी सामन्याच्या परिस्थितीनुसार गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक बदलत राहतो.