बिहारमधील घडामोडींमधून संकेत : तेजस्वी यादव सतर्क भूमिकेत
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची अलिकडच्या काळातील वक्तव्यं पाहिल्यास राज्याच्या राजकारणाची दिशा वेगाने बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत. पाटणा येथे गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीश कुमार यांची शैली वेगळीच दिसून आली. तर त्यांच्या बाजूला उभे असलेले उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे नाराज दिसून येत होते. यामुळे लवकरच काका-पुतण्याची जोडी तुटणार असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे. नितीश कुमार यांनी गुरुवारी महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात यावे असे वक्तव्य पेले आहे. या विधेयकातील तरतुदी विलंबाने लागू होणार असल्या तरीही याचा लाभ महिलांना मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांची ही भूमिका राजदपेक्षा निश्चितच वेगळी आहे.
तर इंडिया या आघाडीची भोपाळ येथील प्रस्तावित सभा रद्द झाल्याची कल्पना नसल्याचे नितीश यांनी गुरुवारी सांगितले. नितीश यांच्या या भूमिकेमुळे ते राजदवर नाराज असल्याचे मानले जात आहे. तेजस्वी यादव यांची गुरुवारी पत्रकार परिषदेवेळी असणारी देहबोली देखील बरेच काही सांगून जाणारी होती. पत्रकार परिषदेत दोघेही एकमेकांकडे पाहणे टाळत होते. तत्पूर्वी दिल्लीत आयोजित जी-20 परिषदेवेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आयोजित डिनरवेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीचे छायाचित्र पंतप्रधान मोदींनीच सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर नितीश पुन्हा रालोआच्या गोटात सामील होणार असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान नितीश कुमार यांच्याबद्दल बदललेल्या सुरामुळे देखील या चर्चेला बळ मिळाले आहे. भाजपने देखील काही दिवसांपासून नितीश कुमार यांना लक्ष्य करणे प्रकर्षाने टाळल्याचे चित्र आहे.