मोळी डावावर पंजाबच्या पैलवानाला 5 मिनिटात लोळवले, हजारो कुस्ती शौकिनांची उपस्थिती
संजय पाटील हातनूर
तासगाव तालुक्यातील विसापूर येथे झालेल्या विसापूर केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पैलवान सिकंदर शेखने पटकावले. अवघ्या 5 मिनिटात पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला सिकंदरने मोळी डावावर लोळवत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत देशभरात सर्वाधिक चर्चा झालेल्या पैलवान सिकंदर शेखची 5 लाखांची ही कुस्ती होती. राज्यभरातून कुस्ती शौकिनांनी उपस्थिती लावली होती.या मैदानावर रोहित पाटील, माजी आमदार सदाशिव पाटील, कुस्ती क्षेत्रातील दिगज नाव संभाजीतात्या सावर्डेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ पाटील, मोहनआण्णा पाटील, जि प सदस्य अर्जुन पाटील, माजी जि प सदस्य पै निवासनाना पाटील, ढवळीचे अशोकराव माने, हातनुरचे माजी सरपंच रावसाहेब भाऊ पाटील, यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील वस्ताद, समालोचक, अभ्यासक, राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिगज्यांची उपस्थिती या मैदानावर होती.
विसापूर येथे यल्लमादेवी यात्रेनिमित्त भारतातील नामवंत मल्लांच्या उपस्थितीत कुस्ती मैदानाचे आयोजन गुरुवार दि. 19 जानेवारी रोजी केले होते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मल्ल कुस्तीसाठी आल्यामुळे या मैदानाला विशेष महत्त्व होते. या मैदानावर लहान मोठया 150 ते 200 चटकदार कुस्त्या उशिरापर्यंत सुरू होत्या.विसापूर कुस्ती कमिटीचे अध्यक्ष सुभेदार मुरलीधर माने-पाटील, कुस्ती कमिटीचे उपअध्यक्ष प्रकाश नाना माने-पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी हे मैदान भरवले होते.