बेळगाव : ऐन दिवाळीत बेळगाव शहर व उपनगरात गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी वॉकिंगसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र पळविण्यात आले आहे. महांतेशनगर येथे घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. महांतेशनगर येथील पी अॅण्ड टी क्वॉर्टर्सजवळ शुक्रवारी सायं. 7.30 वाजण्याच्या सुमारास शांता निंगाप्पा जमकी या वॉकिंग करून घरी परतताना पाठीमागून त्यांचा पाठलाग करीत आलेल्या भामट्याने अचानक त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हात घातला. त्यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परिणामी मंगळसूत्राचा एक छोटा तुकडा शांता यांच्या हातात राहिला.
पायी चालत केला पाठलाग
सायंकाळी आपल्या शेजारणींबरोबर शांता या वॉकिंगला गेल्या होत्या. वॉकिंगहून घरी परतताना त्यांच्या घराजवळच त्यांचे मंगळसूत्र पळविण्यात आले आहे. खादी भांडारपासून पायी चालत एकटा आपला पाठलाग करीत होता. महांतेशनगर येथे आल्यानंतर त्याने मंगळसूत्र हिसकावून घेतले. आपण आरडाओरडा करताच भामट्याने तेथून पळ काढल्याचे शांता यांनी सांगितले.
रात्री उशिरापर्यंत शोध सुरू
घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. शांता यांच्याकडून संपूर्ण घटनेसंबंधी अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. पळून जाण्याच्या भरात भामट्याने आपल्या चपला तेथेच सोडून दिल्या आहेत. त्याचा माग काढण्यासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. मंगळसूत्र पळविणारा भामटा चालत आला होता. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते.