भारतीय महिला संघाचा 19 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. श्रीलंकेच्या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 116 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेच्या संघ 20 षटकांत आठ विकेटच्या मोबदल्यात 97 धावांपर्यंत मजल मारु शकला. याशिवाय, कांस्यपदकाच्या लढतीत बांगलादेशने पाकिस्तानला नमवण्याची किमया साधली. भारताच्या तितास साधूने 4 षटकांत 6 धावा देत तीन बळी मिळवत विजयात मोलाची भूमिका बजावली.
सोमवारी हांगझाऊ येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात क्रिकेटचा समावेश होण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी, दोन वेळा क्रिकेट या खेळांचा भाग झाला तेव्हा भारताने त्यात भाग घेतला नव्हता. यंदा प्रथमच भारतीय महिला संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला आणि पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.
सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 116 धावा केल्या आहेत. श्रीलंकेसमोर विजयासाठी 117 धावांचे लक्ष्य होते. सलामी फलंदाज स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी वेगवान सुरुवात केली. पण नऊ धावांवर शेफाली वर्मा तंबूत परतली. पण त्यानंतर स्मृतीने जेमिमासोबत भारताचा डाव सावरला. दोघींनी 80 धावांची भागीदारी केली. ही जोडी खेळत होती, तोपर्यंत भारत 150 धावसंख्येपर्यंत पोहचेल असेच वाटत होते. पण स्मृती बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. स्मृतीने 45 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. तर जेमिमाने 40 चेंडूत 42 धावांचे योगदान दिले. यामध्ये पाच चौकारांचा समावेश आहे. ही जोडी फुटल्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. रिचा घोष 9, हरमनप्रीत कौर 2, पूजा 2, अमनज्योत कौर 1, दीप्ती शर्मा नाबाद 1 यांना मोठी खेळी करता आली नाही. यामुळे भारताला 20 षटकांत 7 बाद 116 धावा करता आल्या. श्रीलंकेकडून प्रबोधनी, सुगंधिका, इनोका यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
117 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवातही चांगली झाली नाही. त्यांनी 14 धावांत 3 विकेट गमावल्या आणि पहिल्या तीन विकेट तीतस साधूने घेतल्या. मात्र, यानंतर हसिनी परेरा आणि निलाक्षी डी सिल्वा यांनी शानदार फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी 33 चेंडूत 36 धावांची भागीदारी करत टीम इंडियाचे टेन्शन वाढवले, मात्र राजेश्वरी गायकवाडने हसिनीला बाद करून ही जोडी फोडली. हसीनी परेराने 26 आणि निलाक्षी डिसिल्वाने 23 धावा केल्या. यानंतर लंकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने त्यांना 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 97 धावा करता आल्या आणि टीम इंडियाने हा सामना 19 धावांनी जिंकला.