जीवनात स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहण्याची महिलांना सुसंधी
वार्ताहर /उचगाव
बेळगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावात गल्लोगल्ली बचतगटांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र विविध व्यवसाय चालविण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहण्यासाठी या गटांना योग्यवेळी मार्गदर्शनाची व दिशा देण्याची खऱया अर्थाने आजच्या घडीला गरज असल्याचे मत काही तज्ञ महिलांनी व्यक्त केले आहे. बचत ही महिलांच्या रक्तातच भिनलेली आहे. मात्र ती आतापर्यंत महिलांना ओळखता आली नाही. बाजारात गेलेली स्त्राr आठवडय़ाचा संपूर्ण बाजार करून थोडे पैसे नवऱयाला नकळत शिलकीत टाकत असते. हेच पैसे भविष्यात काही संसारात अडचणी आल्यास त्या सोडविण्यास स्वतःहून खर्च करते. बचत गटाचा प्रसार आज बघता बघता देशभर वाढताना दिसून येत आहे. यासाठी सर्व वर्गातील महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
आर्थिक मदतीसाठी बँकांचा पुढाकार
बचत गट संकल्पना ही चांगली योजना आहे. या माध्यमातून महिला एकत्र येतात. स्वतःचे सुख-दुःख समजावून घेऊन प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून येतात. महिलावर्गाला या निमित्ताने स्वतःचे व्यासपीठ मिळते आणि महिला वर्गातील सुप्तगुणांना वाव मिळून जातो. बचत गटाला आता आर्थिक मदत करण्यास बँकांनी पुढाकार घेतला आहे. कोणताही व्यवसाय करण्यात सवलत असते. अल्प व्याजदराने कर्ज स्वीकारताना कोणत्याही प्रकारचे कागदी घोडे नाचवावे लागत नाहीत. एकमेकींच्या विश्वासावर हा संघ चालतो. मात्र कुटुंबातील प्रमुखांची एक स्वाक्षरी त्यावर घ्यावी लागते. बचत गटाच्या माध्यमातून पैसे घेऊन खरंतर महिला वर्गाने स्वतःचा व्यवसाय करून उत्कर्ष करून दाखवावयास हवा. या व्यवसायाच्या माध्यमातून पैसे उभारून घेतलेल्या कर्जाची परतफेड करावयास हवी.
महराष्ट्रात मोठी चळवळ
महाराष्ट्रात बचत गटांची चळवळ सध्या मोठय़ा प्रमाणात चालली आहे. तेथील सरकारलासुद्धा त्याची दखल घ्यावी लागते. त्यामानाने कर्नाटकात अजून बचत गटाने बाळसे धरले नाही. येथील महिलावर्ग कर्ज घेतात. मात्र यातून काही महिला स्वतः स्व-सहाय्य संघाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय करतात. मात्र बऱयाच महिला घरसंसार, संसारोपयोगी साहित्य, सोसायटीची थकीत कर्जे, शेती उद्योगासाठी पतीच्या व्यवसायात गुंतवितात. स्वतःहून कोणता व्यवसाय करताना दिसत नाहीत. बचत गटांच्या माध्यमातून कर्जाऊ रक्कम देणाऱया मार्गदर्शकांनी महिला वर्गाला उद्योग उभारण्याची कल्पना द्यावयास हवी. महिलावर्गाला स्वतंत्र व्यवसाय म्हणजे किराणा दुकान, दुग्ध व्यवसाय, शेळ्या-मेंढय़ा पालन, दुग्ध व्यवसायासाठी जनावरे खरेदी, मेणबत्ती बनविणे, दिवे बनविणे, फराळाचे साहित्य तयार करणे, पापड, सांडगे, मसाला, उद्योग, साबण बनविणे, अगरबत्ती बनविणे असे उद्योग चालविता येतात.
व्यवसाय करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन आवश्यक
महिलावर्गाला स्वतःचे घर संसार आणि शेतीची कामे सांभाळून फावल्या वेळेत हा व्यवसाय करण्यास सवलत आहे. मात्र कोणता व्यवसाय करावा म्हणजे तो चांगल्याप्रकारे चालेल याचे मार्गदर्शन करण्याचा दुवा त्यांच्याजवळ नाही. त्यामुळे महिला गडबडून जातात. बँकेमधून कर्जाऊ रक्कम देणाऱयानी महिलावर्गाला मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. बचत गटांच्या माध्यमातून शिवणक्लासचे शिक्षण, पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम, ग्राम स्वच्छता अभियान, तळागाळातील शिकणाऱया मुलींना प्रोत्साहन धन, महिला दिन, महिला आरोग्य तपासणी शिबिर या मोहिमा राबविल्या जाताहेत. समाजातील महिलांना संघटित करण्याचा प्रयत्न बचत गटांच्या माध्यमातून सुरू आहे. याला महिलावर्गाची सकारात्मक जोड मिळायला हवी.