पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास : देशातील सर्व महिलांचे केले अभिनंदन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये आरक्षण देणारा ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ हा सर्वसामान्य कायदा नसून त्यात देशाच्या भवितव्याला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. येथील भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयात एका विशेष कार्यक्रमात ते भाषण करीत होते. हा कार्यक्रम ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ याच नावाचा होता.
महिलांच्या पुढाकाराने भारताचा विकास करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. त्याची पूर्तता करण्याच्या दिशेने या कायद्यामुळे वेगाने वाटचाल होणार आहे. हा कायदा म्हणजे भारताच्या लोकशाहीवरच्या निष्ठेची उद्घोषणा आहे. लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड बहुमताने हा कायदा संमत करण्यात आला. हे श्रेय साऱ्या महिलांचे आहे, असेही गौरवाद्गार त्यांनी त्यांच्या भाषणात काढले.
संधी मिळाली हे भाग्य
देशातील दशकोट्यावधी जनतेने आमच्यावर विश्वास टाकला. त्यामुळे आम्ही पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करु शकलो. परिणामी असे ऐतिहासिक कायदे करण्याचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त झाले आहे. महिला शक्तीला वंदन करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचे थोर भाग्य आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
देशाचे भवितव्य घडणार
काही निर्णय असे असतात की ज्यांच्यामुळे देशाचे भवितव्य पालटते. गुरुवारी आपण सर्वजण अशाच एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार ठरलो. नारीशक्ती वंदन कायदा संसदेत संमत झाल्यामुळे महिलांनी गेली कित्येक दशके पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले आहे. यापूर्वी अनेकदा महिलांना आरक्षण देण्याचे प्रयत्न झाले. तथापि, काही पक्षांच्या राजकीय स्वार्थामुळे ते सफल झाले नाहीत. आम्ही मात्र, कोणाचाही राजकीय स्वार्थ न जुमानता आरक्षणाचा कायदा प्रत्यक्षात आणून दाखविला आहे. यासाठी मी सर्व राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींचा आभारी आहे. हे यश सर्वांचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
महिलांसाठी विविध योजना
गेल्या नऊ वर्षांच्या काळात केंद्रातील भारतीय जनता पक्ष आणि रालोआ सरकारने महिलांसाठी अनेक योजना एकापाठोपाठ एक आणल्या. त्यांचे प्रभावी क्रियान्वयन केले. त्यामुळे कोट्यावधी महिलांचे जीवन सुसह्या झाले आहे. भारतीय जनता पक्ष नेहमी देशाचा विचार आधी करतो, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
सर्व अडथळे दूर करणार
भारतातील माता, भगिनी आणि कन्या यांच्या प्रगतीच्या मार्गांमधील प्रत्येक अडथळा दूर करण्याचा आमचा निर्धार आहे. संसद आणि विधानसभा यांच्यातील महिला आरक्षणाच्या मार्गातही असे अनेक अडथळे होते. तथापि, जेव्हा निर्णयकर्त्यांचे हेतू आणि मन स्वच्छ असते, तसेच त्यांच्या प्रयत्नांमध्ये पारदर्शित्व असते, तेव्हा अडथळे कितीही मोठे असले तरी ते सहजगत्या दूर होतात. ज्या बहुमताने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत संमत करण्यात आले, त्यामुळेही एक नवा इतिहास घडला आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
नारीशक्तीला लवून वंदन
या कार्यक्रमात अनेक महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला. या महिलांना त्यांनी लवून प्रणाम केला. या महिलांनी आरक्षण विधेयक संसदेत संमत करुन घेतल्याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आणि आभारही मानले. देशभरात महिलावर्गाने या आरक्षणावर आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भलावण
ड देशातील महिला शक्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भलावण
ड महिला आरक्षण कायद्यामुळे लोकशाही अधिक बळकट होणार
ड हे ऐतिहासिक विधेयक संमत करण्याची संधी मिळणे हे भाग्य
ड नऊ वर्षांमध्ये महिलांसाठी केंद्र सरकारकडून विविध उपक्रम