कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांना लैंगिक छळाच्या आरोप करून त्यांना अटक करण्याची मागणा करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी सरकारचा निषेध करत आपली सर्व पदके गंगा नदित विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. या विसर्जनानंतर आंदोलक पुन्हा नवीन इंडिया गेटवर बेमुदत आंदोलनाला बसणार आहेत.
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार ब्रिजभुषण सिंग यांच्या विरोधात निदर्शने करून त्यांच्या अटकेची मागणी करत आहेत. 28 तारखेला त्यांनी केलेल्या निदर्शनावरून त्यांना अटक होऊन त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.
आज आंदोलक महीला कुस्तीपटूंनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी हरिद्वारला जाउन संध्याकाळी 6 वाजता गंगा नदीत आपल्या पदकांचे विसर्जन करण्याचा निर्धार केला असल्याचे घोषित केले आहे. आपल्या निवेदनात त्यांनी “ही पदके म्हणजे आमचे प्राण आहेत, आमचा आत्मा आहेत. आज आम्ही त्यांचे विसर्जन करणार आहोत. त्यांना गंगेत फेकून दिल्यावर जगण्याचे कोणतेही कारण उरणार नसल्याने आम्ही इंडिया गेटवर मरेपर्यंत उपोषण करू,” असे म्हटले आहे.
पुढे बोलताना महिला कुस्तीपटूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाल्या आहेत कि, “ आम्हाला स्वताच्या मुली मानणाऱ्या पंतप्रधानांनी एकदाही महिला कुस्तीपटूंबद्दल काळजी दर्शविली नाही. उलट त्यांनी अत्याचारी ब्रिजभूषण सिंग यांना संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले. त्याने आपल्या चमकदार पांढऱ्या कपड्यांमध्ये फोटोही काढले आहेत.” असे आपल्या निवेदनात म्हटले आहे.