एशियन गेम्स : उपांत्य फेरीत बांगलादेशचा उडवला धुव्वा : भारत-श्रीलंका यांच्यात रंगणार फायनल
भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत किमान रौप्यपदक निश्चित केले आहे. रविवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 51 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने दोन गडी गमावून 52 धावा करत हा सामना जिंकला व थाटात अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या एका सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता, भारत व श्रीलंका यांच्यात सुवर्णपदकासाठी आज लढत होईल.
सुरुवातीला बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच षटकात पूजा वस्त्राकारने भारताला विकेट मिळवून दिली. यानंतर बांगलादेशचा डाव सावरता आला नाही. पॉवरप्ले संपेपर्यंत बांगलादेशने 21 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. बांगलादेशची कर्णधार निगार ही एकमेव फलंदाज होती, जिने दुहेरी आकडा पार केला. निगारलाही ही खेळी जास्त वाढवता आली नाही आणि ती केवळ 12 धावा करून बाद झाली. नदिहाने 9 धावांची खेळी खेळली. यानंतर इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यामुळे बांगलादेशचा डाव 17.5 षटकांत 51 धावांवर आटोपला. भारताकडून पूजा वस्त्राकारने 4 षटकात 17 धावा देऊन 4 बळी घेतले. पूजा व्यतिरिक्त तीतास साधूने अतिशय सुरेख गोलंदाजी केली. साधूने 4 षटकात केवळ 10 धावा दिल्या आणि एक विकेट घेण्यात यश मिळविले. राजश्री गायकवाडने 3.5 षटकात 8 धावा देत एक बळी मिळवला. अमनजोत कौर आणि देविका वैद्य यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.
52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काही खास नव्हती. भारताने 3.5 षटकांत कर्णधार स्मृती मानधनाची विकेट गमावली. स्मृतीला 12 चेंडूत केवळ 7 धावा करता आल्या. शेफाली वर्माने 2 चौकारासह 17 धावांचे योगदान दिले. शेफाली बाद झाल्यानंतर नाबाद 20 धावांची खेळी खेळून जेमिमाने भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. भारताने विजयी लक्ष्य 8.2 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
पाकिस्तानला नमवत श्रीलंका अंतिम फेरीत
रविवारी झालेल्या महिलांच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाक महिला संघाला 20 षटकांत 9 बाद 75 धावा करता आल्या. यानंतर विजयासाठीचे 76 धावांचे लक्ष्य लंकन महिला संघाने 16.3 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
आज, सोमवारी भारतीय महिला व श्रीलंकन महिला संघ यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल. प्रथमच आशियाई स्पर्धेत सहभागी होणाऱ्या टीम इंडियाला गोल्ड जिंकण्याची नामी संधी असणार आहे.