जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर्सने केलेली कामगिरी निश्चितच ऐतिहासिक म्हणावी लागेल. दिल्लीतील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील देशोदेशीच्या महिला खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकली, तर त्यात भारतीय बॉक्सरची कामगिरी उठून दिसते. यातील निखत झरीनची कामगिरी आश्वासक ठरावी. सलग दुसऱयांच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे स्वाभाविकच तिची तुलना मेरी कोमशी केली जाऊ शकते. अर्थात अजून तिला बराच टप्पा गाठायचा असला, तरी तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत, हे नक्की. भारतीय महिला बॉक्सिंगमध्ये मेरी कोमचे स्थान धुवासारखे अढळच. 2002, 2005, 2006, 008, 2010, 2018 अशी तब्बल सहा वेळा मेरीने जगज्जेतेपदाला गवसणी घातल्याचे पहायला मिळते. याशिवाय एशियन गेम्स, कॉमनवेल्थ, एशियन चँपियनशीप अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करणाऱया या जगज्जेतीने लंडन ऑलिंपिकमध्येही कांस्यपदक पटकावत देशाचे नाव उंचावले. आज मेरीपासून स्फूर्ती घेत बॉक्सिंगसह विविध खेळांमधून मुली पुढे येताना दिसतात. हे चित्र आशादायीच. मागील वर्षी 52 किलो वजनी गटातून खेळलेल्या निखतने या खेपेला 50 किलो वजन गटातून मैदानात उतरत ज्या पद्धतीने खेळ केला, तो लाजवाब ठरावा. पायाच्या वेगवान हालचालींसह अचूक पंच आणि कमालीची एकाग्रता दाखविणाऱया निखतने व्हिएतनामच्या कसलेल्या खेळाडूचे आव्हान ज्या पद्धतीने मोडून काढले, त्याला तोड नाही. लवलिना बार्गेहिन ही म्हणजे भारतीय बॉक्सिंगला मिळालेली नवी तारकाच म्हणता येईल. 2020 च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक मिळवित जगाचे लक्ष वेधून घेणाऱया लवलिनाने जागतिक स्पर्धेतही आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत एक पाऊल पुढे टाकले आहे. 2018 व 19 च्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यवर समाधान मानाव्या लागलेल्या लवलिनाने सुवर्णपदक जिंकण्याचे उद्दिष्ट बाळगले होते. ही स्वप्नपूर्ती तिच्याकरिता निश्चितपणे महत्त्वाचा क्षण असेल. आगामी ऑलिंपिकमध्ये या 25 वर्षीय खेळाडूकडून सुवर्णपदकाचीही अपेक्षा राहील. याशिवाय नीतू घंघास आणि स्वीटी बुरा यांची कामगिरीही अफलातूनच. नीतूला गतस्पर्धेत मोक्याच्या क्षणी केलेल्या चुकांमुळे सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले होते. मात्र, त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची या खेपेला तिने विशेष काळजी घेतली. उत्तम बचाव व आक्रमकतेला हुशारीची जोड देत या 22 वर्षीय बॉक्सरने प्रतिस्पर्धी मंगोलियाच्या खेळाडूचा 5 विरूद्ध 0 ने पाडलेला फडशाच तिच्या खेळाबद्दल बरेच काही सांगून जातो. भिवानी, हरियाणाच्या या खेळाडूने यूथ चँपियशनशीपमध्येही आपले कौशल्य दाखवून दिले आहे. वयाचा विचार करता अद्याप मोठी कारकीर्द तिच्या हातात असल्याने तिच्याकडून भविष्यात उत्तुंग कामगिरीची अपेक्षा असेल. आशियाई स्पर्धेतील सुवर्णविजेत्या स्वीटी बुराचा विजयही उल्लेखनीय. मुख्य म्हणजे चीनच्या 2018 मधील जगज्जेत्या वांग लीनाला तिने दणका दिला. त्यातूनच तिच्या यशाचे मोल लक्षात यावे. यापूर्वी रौप्यपदक तिच्या नावावर असले, तरी सुवर्णपदकामुळे तिच्या कारकिर्दीला नवी झळाळी मिळाली, असे म्हणता येईल. हरियाणाच्या या 30 वर्षीय खेळाडूने वेगवेगळय़ा स्पर्धांमध्ये आपले अस्तित्व दाखवून दिले असले, तरी हे यश तिच्यासाठी खास आहे. महिला बॉक्सिंगचा आढावा घेतला, तर भारताने आत्तापर्यंत 12 सुवर्णपदके जिंकली आहेत. यातील सहा एकटय़ा मेरी कोमची आहेत. याशिवाय सरितादेवी, जेनी आर. एल. लेखा के. सी. यांनीही पदके मिळविली आहेत. किंबहुना, मेरीप्रमाणे सातत्य दाखविण्यासाठी उदयोन्मुख बॉक्सरला कठोर मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही. बॉक्सिंग हा एक दमदार खेळ आहे. यात टायमिंगला अतिशय महत्त्व असून, एकग्रतेशिवाय ते साधले जाऊ शकत नाही. याशिवाय खेळात आक्रमकता आणि बचाव याचाही भक्कम बचाव असायला हवा. इतर खेळाडूंमधील कच्चे दुवे हेरण्याबरोबरच आपल्या रणनीतीत, खेळात वैविध्य कसे आणता येईल, याकडेही खेळाडूंनी बारकाईने लक्ष द्यायला हवे. त्याचबरोबर तंदुरुस्तीवरही प्रत्येकाने काम करायला हवे. बॉक्सिंगशिवाय नेमबाजीतील महिलांची कामगिरीही दणकेबाज म्हणता येईल. वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरने 25 मीटर पिस्तूल प्रकारात, तर सिफ्त कौर सामरा हिने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक पटकावत मिळविलेले यश लक्षवेधकच म्हटले पाहिजे. सिफ्तने डॉक्टर होण्यासाठी नेमबाजी सोडण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, या पदकानंतर ऑलिंपिकपर्यंत नेमबाजी करण्याचा तिचा निर्धार महत्त्वाचाच. या स्पर्धेत सात पदकांसह भारताने चीनपाठोपाठ दुसरे स्थान प्राप्त केले आहे. नेमबाजीतील यशाचा हा सिलसिला ऑलिंपिकमध्ये कायम ठेवण्याकरिता खेळाडूंना आपले ‘लक्ष्य’ कायम ठेवावे लागेल. दुसरीकडे पहिली वहिली वूमन्स आयपीएलही जोरदार झाली. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने मिळविलेले विजेतेपद विशेषच. कालपरवापर्यंत केवळ स्टार पुरुष क्रिकेटपटूंची नावे चाहत्यांच्या तोंडी असत. आता महिला क्रिकेटरची नावेही सर्वतोमुखी झालेली दिसतात. हरमनप्रीत, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, नॅट सिव्हर ब्रंट, हेली मॅथ्यूज, मेग लॅनिंग, जेमिना रॉड्रिग्ज असे कितीतरी खेळाडू चमकले. स्वाभाविकच डब्ल्यूपीएलही आता दर हंगामात रंगत जाणार, यात संदेह नाही. याखेरीज राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णयश मिळविलेल्या भवानीदेवीकडूनही आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठय़ा अपेक्षा आहेत. एकेकाळी क्रिकेट, बॉक्सिंगसारख्या खेळांवर प्रामुख्याने पुरुष खेळाडूंचीच मक्तेदारी असे. तथापि, महिलांनीही ‘पंच’ काय असतो, चौकार-षटकारांची आतषबाजी करत मैदान कसे गाजवायचे असते, हे दाखवून दिले आहे. जवळपास सर्वच क्रीडाप्रकारांत महिला पुढे येत असून, आपल्यातील गुणवत्ता दाखवून देत आहेत. पालकांच्या पाठिंब्यासह क्रीडापूरक वातावरण, सुरक्षितता यांसारख्या गोष्टी जुळून आल्या, तर खेळात ‘महिला राज’ निर्माण होण्याचा दिवस दूर नाही.
Previous Articleकर्जधारकाला सुनावणीची संधी द्या!
Next Article अफगाणचा पाकवर मालिका विजय
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.