शेतकरी, नागरिकांच्या मागणीची दखल
प्रतिनिधी /वाळपई
म्हादई नदीच्या गांजे येथे जुना बंधारा हटविण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. नवीन प्रकल्प उभारल्यानंतर हा बंधारा हटवविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱयांनी केली होती. त्याची दखल घेऊन जलसंपदा खात्याच्या माध्यमातून सदर बंधारा हटविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजनेंतर्गत याठिकाणी हा बंधारा बांधला होता. या बंधाऱयात प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा करण्यात येत होता. या जुन्या बंधाऱयामुळे अनेक भागांना महापुराचा तडाखा बसत होता. त्यामुळे सदर बंधारा हटविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेऊन गेल्या दोन दिवसांपासून सदर बंधारा हटविण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे.
दरम्यान, प्रमुख अभियंता प्रमोद बदामी यांनी जुना बंधारा हटविण्यासंबंधी आश्वासन दिले होते. या बंधाऱयामुळे काठावरील शेती-बागायती व घरांना धोका निर्माण होत असल्याचे संबंधितांचे म्हणणे होते. याची दखल घेऊन सदर बंधारा हटविण्याच्या कामाला सुरुवात केल्याचे वाळपई जलसंपदा खात्याचे साहाय्यक अभियंता शैलेश पोकळे यांनी स्पष्ट केले.
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेंतर्गत शंभर कोटी खर्चून याच ठिकाणी नवीन बंधारा बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे ओपा नदीला मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा वळविण्यात येतो. त्यामुळे जुना बंधारा निरुपयोगी ठरल्याचे पोकळे यांनी सांगितले.