नेहरू स्मारकाचे नाव बदलल्याप्रकरणी राहुल यांची टिप्पणी : सर्व माजी पंतप्रधानांचा सन्मान करत असल्याचा भाजपचा दावा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्र सरकारने 14 ऑगस्ट रोजी दिल्लीतील नेहरू स्मारकाचे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय केले आहे. याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जवाहरलाल नेहरू यांची ओळख ही त्यांचे कार्य असून नाव नसल्याचे गुरुवारी म्हटले आहे. आम्ही सर्व माजी पंतप्रधानांचा सन्मान करत आहोत, भले मग ते कुठल्याही पक्षाचे असो. काँग्रेस पक्ष विनाकारण स्मारकाच्या नावाचा मुद्दा करू पाहत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्लीतील तीन मूर्ती परिसरात असलेल्या नेहरू मेमोरियम म्युझियमचे नाव बदलून पीएम म्युझियम अँड लायब्रेरी करण्यात आले होते. याच वर्षी 15 जून रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेतला होता. 1929-30 मध्ये निर्मित तीन मूर्ती हाउसमध्ये भारताचे कमांडर-इन-चीफचे अधिकृत निवासस्थान होते. ऑगस्ट 1948 मध्ये हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान झाले होते. नेहरूंनी येथे सुमारे 16 वर्षे वास्तव्य केले होते. नेहरूंच्या निधनानंतर सरकारने याला नेहरू स्मारक म्हणून घोषित केले होते.
राहुल गांधी लडाख दौऱ्यावर
राहुल गांधी हे गुरुवारी दोन दिवसीय लडाख दौऱ्यावर रवाना झाले आहेत. राहुल गांधी लडाख येथे गुरुवारी दुपारी पोहोचले आहेत. स्थानिक पक्ष नेत्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. लडाख आणि कारगिलला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यावर राहुल गांधी पहिल्यांदाच तेथे पोहोचले आहेत. कारगिलमध्ये पुढील महिन्यात हिल कौन्सिलची निवडणूक होणार आहे. राहुल यांचा दौरा यामुळे देखील महत्त्वपूर्ण आहे. कारगिल हिल कौन्सिल निवडणुकीसाठी काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्स या पक्षासोबत आघाडी केली आहे.
स्वत:चा इतिहास नसल्यानेच…
नेहरू स्मारकाचे नाव बदलण्यात आल्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. ज्यांचा स्वत:चा इतिहास नाही, ते इतरांचा इतिहास नष्ट करू पाहत आहेत. आधुनिक भारताचे निर्माते आणि लोकशाहीचे निर्भिड संरक्षक पंडित जवाहरलाल नेहरू यांचे व्यक्तिमत्व यामुळे छोटे करता येणार नाही. स्मारकाचे नाव बदलण्याचा प्रकार भाजप अन् संघाची संकुचित मानसिकता तसेच हुकुमशाही वृत्ती दर्शवित असल्याचे खर्गे यांनी म्हटले होते.
सोसायटीचे अध्यक्ष पंतप्रधान मोदी
पंतप्रधान संग्रहालय आणि वाचनालय सोसायटीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. याच्या 29 सदस्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यटनमंत्री जी. किशन रे•ाr, माहिती-प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचा समावेश आहे.
पंतप्रधान संग्रहालयाची निर्मिती
2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांना समर्पित एक संग्रहालय स्थापन करण्याची कल्पना मांडली होती. काँग्रेसच्या विरोधानंतरही नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्रेरी परिसरात पंतप्रधान संग्रहालय निर्माण करण्यात आले. 21 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान मोदींनी याचे उद्घाटन केले होते. तेव्हाही काँग्रेसने यावर बहिष्कार टाकला होता.