मोबाईल टॉयलेट असून अडचण….
अहिल्या परकाळे / कोल्हापूर
उन्हाळ्याची सुट्टी झाल्यापासून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहात कार्यक्रमांची रेलचेल आहे. त्यामुळे कलाकारांसह प्रेक्षकांना सर्व सुविधा पुरवणे नाट्यागृह प्रशासनाचे कर्तव्य आहे. पण येथील महिला स्वच्छतागृहाचे काम करण्याच्या कारणावरून गेल्या दोन महिन्यापासून स्वच्छतागृह बंद आहे. गैरसोय टाळण्यासाठी नाटयगृहाच्या आवारात मोबाईल टॉयलेट ठेवण्यात आले आहे. पण ते अडचणीचे ठरत असल्याने कलाकार महिलांसह प्रेक्षक महिलांची कुचंबणा होत आहे. नाटयगृहातील या गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
रंगभूमीचे माहेरघर असलेल्या कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाला वेगळे महत्व आहे.या नाट्यागृहात कार्यक्रम करण्यासाठी देश-विदेशातील कलाकार येत असतात.हौशी नाट्यासंस्थांबरोबर व्यवसायिक नाट्यासंस्थांचा उन्हाळ्याच्या सुट्टीत कार्यक्रमांचा हंगाम असतो. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून नाट्यागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असल्याने दररोज किमान 500 ते 600 प्रेक्षक कार्यक्रमासाठी येतात. यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय आहे.यामुळे स्वच्छतागृहासारखी मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे. पण दुरूस्तीच्या नावाखाली गेल्या दोन महिन्यापासून महिला स्वच्छतागृह बंद ठेवले आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने महिलांकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. मोबाईल टॉयलेट बसमध्ये असल्याने पायऱ्या चढून जाणे ज्येष्ठ महिलांना शक्य नाही. तसेच ते नाट्यागृहाच्या बरोबर समोर असल्याने महिलांना त्याचा काहीच उपयोग होत नाही. तरीही नाट्यागृह प्रशासन लक्ष का देत नाही? असा सवाल महिलांकडून विचारला जात आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहातील स्वच्छतागृहाला महिला बालकल्याणकडून निधी मंजूर झाला आहे. या निधितून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्वच्छतागृहाचे काम सुरू आहे. महापालिका उपायुक्त, नाट्यागृह व्यवस्थापक यांनीही महिला स्वच्छतागृहाचे काम त्वरीत पूर्ण करून देण्याची विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. तरीही स्वच्छतागृहाच्या कामाला ठेकेदारकडून विलंब लागत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’, या म्हणीप्रमाणे महिला स्वच्छतागृहाच्या कामाची अवस्था झाली आहे. महिलांच्या आरोग्याशी निगडीत असलेले स्वच्छतागृहाच्या कामाला विलंब होत असल्याने महिला कलाकारांसह प्रेक्षकांकडून संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग प्रोजेक्ट इंजिनिअर यांच्याशी संपर्क साधला सध्या मी बाहेरगावी असल्याने बोलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
याकडेही लक्ष देण्याची गरज
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून एक कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तरीदेखील सभागृहाच्या साईडपट्ट्या, लाकडी दरवाजे खराब झाले असून कलर गेला आहे. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या पावळण्या तुटल्या आहेत. जिन्याची मोडतोड झाली आहे. तिकिटगृहाची दुरावस्था गेल्या कित्येक वर्षापासून आहे. सभागृहावर असलेल्या नटश्रेष्ठ बाबुराव पेंढाकर कलादालन या नावाच्या पाटीचा कलर गेला असून खराब झाली आहे. तरीही नाट्यागृह प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते.
सातत्याने पाठपुरावा सुरू
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहातील महिला स्वच्छतागृहाचे काम तातडीने करून द्यावे, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परंतू मुदतीत काम पूर्ण करून देणार असल्याचे सांगितले जात आहे. महिलांच्या तक्रारी वाढत असल्याने स्वच्छतागृहाचे काम त्वरीत पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
समीर म्हाब्री (व्यस्थापक, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह)