कामाला चालना, पार्किंगची व्यवस्था
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही दिवसांपासून संथगतीने सुरू असलेल्या सीबीटी बसस्थानकाच्या कामाला चालना मिळाली आहे. त्यामुळे तिसऱया मजल्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सीबीटी बसस्थानकाचा विकास साधला जात आहे. स्थानिक प्रवाशांसाठी सुसज्ज असे बसस्थानक उभारून विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. सीबीटी बसस्थानकाचे काम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. मात्र कोरोना आणि इतर कारणांमुळे कामाला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे बऱयाच दिवसांपासून काम लांबणीवर पडले होते.
आता दोन मजल्यांचे काम पूर्ण होऊन तिसऱया मजल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सीबीटी बसस्थानकासाठी तब्बल 102 कोटींचा निधी खर्ची घातला जाणार आहे. या अंतर्गत बसस्थानकात तळमजला पार्किंग, फलाट, विविध कार्यालये, बसथांबे आणि इतर सुविधा पुरविल्या जाणार आहेत. विशेषतः तळमजल्यात पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा पार्किंगचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. सीबीटी बसस्थानकातील जुने बसस्थानक हटवून नवीन आधुनिक बसस्थानक उभारले जात आहे. स्थानिक बसची इतरत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बससेवा काहीशी विस्कळीत झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकाचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर बस व्यवस्था सुरळीत होणार आहे.