कामगार उपायुक्तांना बांधकाम संघटनेतर्फे निवेदन : विविध योजना तातडीने लागू करण्याची मागणी
बेळगाव : विविध मागण्यांसाठी कामगारांनी मजगाव येथील कामगार कार्यालयाला घेराव घातला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हा घेराव घालण्यात आला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट देण्यात आले. याचबरोबर इतर विद्यार्थ्यांना बुधवारी किट देतो, असे सांगण्यात आले. त्यानंतर हा घेराव मागे घेण्यात आला. यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली निवेदनही देण्यात आले. कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती वेळेत दिली जात नाही. ती वेळेत द्यावी, रोजगार कामगारांना कामगार कार्ड द्यावे, कामगारांचे तसेच त्यांच्या मुलांचे लग्न झाल्यानंतर त्यांना तातडीने मिळणारी रक्कम देणे गरजेचे आहे. मात्र त्याला विलंब होत आहे. घरासाठी 5 लाख रुपये कामगारांना दिले पाहिजेत. मात्र अद्याप ते देण्यात आले नाहीत. यासह इतर मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. शाळांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे तातडीने विद्यार्थ्यांना किट द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. दरवर्षी विद्यार्थ्यांना किट देण्यासाठी विलंब केला जात आहे. सेंट्रींग व बांधकाम कामगारांना पेन्शन लागू आहे. मात्र ती पेन्शनही दिली जात नाही. कामगार कार्यालयाकडे किट किंवा इतर योजना आल्या तरी त्या कामगारांना समजत नाहीत. तेव्हा त्याविषयी जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. वृत्तपत्रांमधून याबाबत माहिती द्यावी. त्यामुळे तातडीने कामगार कार्यालयाकडे येवून किट तसेच इतर योजनांचा लाभ घेता येणे शक्य आहे, असे यावेळी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. मंगळवारी बराच उशीर घेराव घालण्यात आला. त्यानंतर कामगार उपायुक्त नागेश यांनी योजना तातडीने राबविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे माघार घेण्यात आली आहे. यावेळी अॅड. एन. आर. लातूर, अल्लाप्पा सुलतानपूर, जोतिबा पाटील, गजानन उप्पार, शीतल चौगुले, श्रीदेवी बसरीमरद, गीता पुजेरी, यल्लाप्पा मरगण्णाचे यांच्यासह तालुक्यातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.