मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : दोनापावला येथे जागतिक पर्यटन दिन उत्साहात
पणजी : गोवा पर्यटन खात्यातर्फे ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा’ आणि ‘स्काल गोवा’ यांच्या सहकार्याने, जागतिक पर्यटन दिन 2023 साजरा करण्यात आला. दोनापावला येथील ताज सिदाद दी गोवा येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की वार्का बीचवर आगामी जागतिक बीच व्हॉलीबॉल स्पर्धा होईल. त्यामध्ये 31 देशांचा सहभाग असणार आणि राज्यातील पर्यटनाला ती स्पर्धा पुरक ठरणार आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खवंटे, पर्यटन सचिव संजय गोयल, पर्यटन संचालक सुनील अंचिपाका, ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष नीलेश शहा, स्कल इंटरनॅशनलचे अध्यक्ष विवेक केरकर आणि पर्यटन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वषीच्या जागतिक पर्यटन दिनाच्या उत्सवाची संकल्पना ‘पर्यटन आणि हरित गुंतवणूक’ अशी होती, जी शाश्वत पद्धतींबद्दल गोव्याच्या पर्यटन उद्योगाची बांधिलकी दर्शविते.
पर्यटनासाठी भरीव गुंतवणूक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या अभिभाषणात पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीचे महत्त्व सांगितले. समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी 30 कोटींसह सरकारने केलेल्या भरीव गुंतवणुकीवर त्यांनी प्रकाश टाकला. त्याशिवाय महामार्ग सुधारणा आणि शहर स्वच्छतेचे प्रयत्नही हाती घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
दोन लाख रोजगारसंधी
डॉ. सावंत यांनी येत्या 4-5 वर्षात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात सुमारे 2 लाख तऊणांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या रोजगार निर्मितीमध्ये पर्यटनाच्या भूमिकेवर भर दिला. ‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘वोकल फॉर ग्लोबल’ या संकल्पनांना चालना देण्यासाठी उद्योग समर्थनाच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.
जबाबदार-शाश्वत पर्यटन : खंवटे
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गोव्याची समुद्रकिनाऱ्यांपलीकडे असलेली धारणा बदलून ग्रामीण आणि महिला सक्षमीकरणाचे साधन म्हणून ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याची गरज व्यक्त केली. टॅक्सी एग्रीगेटर्सच्या वापरास प्रोत्साहन देतानाच त्यामधील व्यवसायांचे नियमन करण्याच्या आवश्यकतेवरही भर दिला. समाजाच्या कल्याणासाठी सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत खवंटे म्हणाले की, जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पर्यटन क्षेत्राच्या यशाची खात्री करण्यासाठी सर्व भागधारक, उद्योग आणि स्थानिकांकडून आवश्यक असलेल्या सहयोगी प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. आरोन सॅव्हियो लोबो, मिलिंद प्रभू आणि अनिश सूझा होते. त्यांची यावेळी भाषणे झाली. या कार्यक्रमात दोन पात्र तऊणांना शिष्यवृत्ती देऊन स्वर्गीय व्हिन्सेंट रामोस यांच्या स्मृतीचा गौरव करण्यात आला. श्रीमती आयशा यांनी सूत्रसंचालन केले, अध्यक्ष नीलेश शाह यांनी स्वागतपर भाषण केले आणि स्काल इंटरनॅशनलचे अध्यक्ष विवेक केरकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.