250 किलो वजन : बॉम्ब निकामी करण्यात यश
वृत्तसंस्था/ लुब्लिन
जर्मनीपाठोपाठ पोलंडच्या लुब्लिन शहरातही दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडला. बॉम्ब सापडल्यानंतर शहर परिसरातील सुमारे 14 हजार लोकांना घरे तात्पुरती सोडण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, त्यांना घरातील सर्व विद्युत उपकरणे, पाणी आणि गॅस बंद करण्यास सांगितले होते. लोकांना शाळा आणि इतर इमारतींमध्ये हलवल्यानंतर बॉम्ब यशस्वीपणे निकामी करण्यात आला. बांधकामाच्या ठिकाणी सापडलेल्या या बॉम्बचे वजन 250 किलो होते. बॉम्बशोधक पथकाने बॉम्ब निकामी केल्यानंतर लोकांना घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब पोलंडमध्ये यापूर्वीही अनेकदा सापडले आहेत.
गेल्या आठवड्यातच जर्मनीतही अशीच एक घटना समोर आली होती. डसेलडॉर्फ शहरात 500 किलो वजनाचा बॉम्ब सापडला होता. या प्रकारचा बॉम्ब अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात वापरला होता. बॉम्ब सापडल्यानंतर 13,000 लोकांना इतरत्र हलवून निकामी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती.