केरळमधील मंदिराची करत होती देखरेख ः
वृत्तसंस्था / कासरगोड
केरळच्या कासरगोड येथील श्री अनंतपद्मनाभ स्वामी मंदिरातील शाकाहारी मगर बबियाचा रविवारी रात्री मृत्यू झाला आहे. ही मगर पूर्णपणे शाकाहारी होती आणि आहारात केवळ प्रसादच ग्रहण करत होती. एवढेच नाही तर तलावातील एकाही माशाला किंवा अन्य कुठल्याही प्राण्याला तिने कधीच नुकसान पोहोचविले नव्हते. या मगरीला मंदिराची देखभाल करणारी असल्याचे मानले जात होते.
बबिया मगर शनिवारपासूनच बेपत्ता होती आणि रविवारी रात्री सुमारे 11.30 वाजता बबियाचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आल्यावर याची माहिती पोलीस आणि पशूपालन विभागाला देण्यात आली. मगरीचे अंत्यदर्शन करण्यासाठी सोमवारी राजकीय नेत्यांसह शेकडो लोकांची गर्दी झाली होती.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी बबिया मगरीला श्रद्धांजली वाहिली आहे. 70 पेक्षा अधिक वर्षांपासून मंदिराची देखभाल करणाऱया बबिया मगरीला मोक्ष प्राप्त झाला असेल अशी अपेक्षा आहे. दिवंगत मगर भात आणि गुळाचा प्रसाद खाऊन मंदिराच्या तलावात 70 वर्षांपेक्षा अधिक काळ होती असे त्यांनी म्हटले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनीही मगरीला श्रद्धांजली वाहिली आहे. लाखो भाविकांनी देवाचा अंश म्हणून बबियाचे दर्शन घेतले होते असे सुरेंद्रन यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
केरळमधील प्रसिद्ध अनंथापुरा तलाव मंदिराचे रक्षण करणारी बबिया मगर पूर्णपणे शाकाहारी होती. या मगरीने 70 वर्षांमध्ये कुणालाच इजा केली नव्हती. या मंदिराच्या नजीकच नदी वाहते. हजारोंच्या संख्येत पर्यटक आणि भाविक या मंदिरातील बबिया मगरीला पाहण्यासाठी येत होते.