अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी एक अनोखे उपकरण तयार केले आहे. हे उपकरण एक मायक्रोस्कोपिक कॅमेरा असून तो इतका लहान आहे की हातावर ठेवल्यावरही सहजपणे दिसून येणार नाही. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास हा कॅमेरा मिठाच्या कणाइतका आहे. परंतु हा कॅमेरा स्वत:च्या आकारापेक्षा हजारपट अधिक मोठी छायाचित्रे काढू शकतो. कॅमेऱ्याचा आकार केवळ अर्धा मिलिमीटर असून तो काचेने तयार करण्यात आला आहे.
हा कॅमेरा अत्यंत लहान असला तरीही मोठा उपयुक्त आहे. प्रिन्सटन युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या संशोधकांनी मिळून हा कॅमेरा तयार केला आहे. हा कॅमेरा स्वत:च्या आकाराच्या 5 लाख पट अधिक मोठी छायाचित्रे कैद करू शकतो. या कॅमेऱ्याचा सर्वाधिक लाभ वैद्यकीय क्षेत्रात होणार आहे. या कॅमेऱ्याद्वारे शरीरातील गोष्टी पाहण्यास डॉक्टरांना मोठी मदत होणार आहे. याच्या आसपास सुपर स्मॉल रोबोट्स सेंस देखील करू शकतील आणि डॉक्टरांना अध्ययनात मदत करू शकणार आहेत. हा पॅमेरा वैज्ञानिक इथान सेंग यांनी तयार केला असून यात 1.6 दशलक्ष सिलिंड्रिकल पोस्ट असल्याचे त्यांचे सांगणे आहे.
कॅमेरा लहान असला तरीही छायाचित्रे वाइड अँगलने टिपू शकतो. तसेच या छायाचित्रांची गुणवत्ता देखील अत्यंत चांगली असणार आहे. आतापर्यंतच्या मायक्रो
कॅमेऱ्यांमध्ये छायाचित्रे धुसर प्राप्त व्हायची आणि रंगांमध्येही अडचणी यायच्या. परंतु या छोट्या कॅमेऱ्यात ही समस्या उद्भवणार नाही. हा नैसर्गिक प्रकाशात उत्तम काम करणार आहे. तर लेझर लाइटमध्ये अधिकाधिक गुणवत्तायुक्त छायाचित्रे काढून देणार आहे. यात 120 डिग्री फिल्ड ह्यू मिळणार असून एक्सटेंडेड रेंज 3 मिलिमीटरपासून 30 मिलिमीटरपर्यंत असणार आहे.