वृत्तसंस्था/ माँट्रियल
डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्नियाकीने तीन वर्षांच्या खंडानंतर झोकात पुनरागमन करताना येथे सुरू असलेल्या कॅनडा ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. तिने ऑस्टेलियाच्या पात्रता फेरीतून आलेल्या किम्बर्ली बिरेलचा पराभव केला.
वोझ्नियाकीने 97 मिनिटांच्या खेळात बिरेलचा 6-2, 6-2 असा धुव्वा उडवित दुसरी फेरी गाठली. फॅमिली जीवन सुरू करण्यासाठी तिने तीन वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली होती. ती सध्या दोन मुलांची माता असून मोठा ब्रेक घेतला असला तरी तिच्या खेळात आधीचा सफाईदारपणा या सामन्यात दिसून आला. गेल्या जूनमध्ये तिने निवृत्ती मागे घेणार असल्याचे जाहीर केले होते. स्पर्धात्मक इव्हेंटमध्ये पुन्हा भाग घेतल्याचा खूप आनंद होत आहे, अशा भावना तिने व्यक्त केल्या. तिने ही स्पर्धा 2010 मध्ये जिंकली होती. कोर्टवर उतरली तेव्हा तिचे चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. तिची पुढील लढत नवव्या मानांकित झेकची विम्बल्डन चॅम्पियन मर्केटा वोन्ड्रूसोव्हा किंवा इजिप्त मयार शरीफ यापैकी एकीशी होईल. वोझ्नियाकीने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमचे जेतेपद पटकावले होते. अन्य एका सामन्यात डॅनियली कॉलिन्सने युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाचा 6-2, 6-2 असा पराभव केला. याशिवाय दारिया कॅसात्किना व ल्युडमिला सॅम्सोनोव्हा यांनीही दुसरी फेरी गाठली आहे.