क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी पाच तास चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित ठेवण्यात येणार आहे. बुधवारी काही कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा केली. काही मुद्द्यांवर समझोता झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. कुस्तीपटूंनी काही मागण्यांवर चर्चा केल्याचे समजते.
15 जूनपर्यंत ब्रिजभूषण सिंग यांची चौकशी पूर्ण झाली पाहिजे आणि त्यांच्यावर आरोपपत्र सादर झाले पाहिजे अशी कुस्तीपटूंची अट होती. ती मान्य करण्यात आल्याने तोपर्यंत आंदोलन स्थगित ठेवण्यात आले. चर्चा सकारात्मक झाल्याचे अनुराग ठाकूर यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
निवडणूक 30 जूनपर्यंत
कुस्ती संघटनेची प्रलंबित असलेली निवडणूक 30 जूनपर्यंत व्हावी अशी मागणीही करण्यात आली होती. ती सरकारने मान्य केली आहे. जोपर्यंत संघटनेची निवडणूक होत नाही, तो पर्यंत आयोगाच्या समितीतील दोन सदस्यांची नावे प्रस्तावित केली जाणार आहेत. तसेच महिला कुस्तीपटूंना सुरक्षाही दिली जाणार आहे. कुस्तीपटूंविरोधात असणारे एफआयआर रद्द करण्यात येणार आहेत.
काही मुद्द्यांवर समझोता
काही मुद्दे सरकारने मान्य करण्याची तयारी दर्शविल्याने आम्ही 15 जूनपर्यंत आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे कुस्तीपटूंनीही स्पष्ट केले. चर्चेत बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि तिचे पती सत्यव्रत कादियान यांनी भाग घेतला होता. विनेश फोगाट त्यांनी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे चर्चेसाठी अनुपस्थित होत्या. आंदोलनाचे समर्थन करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही चर्चेत भाग घेतला नाही. आमच्या काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी इतरही अनेक मागण्या आहेत. त्या टप्प्याटप्प्याने मान्य करण्यात येतील अशी आमची भावना आहे, असे कुस्तीपटूंनी नंतर स्पष्ट केले.