बजरंग, साक्षी-विनेशने घेतली भेट : बृजभूषण यांच्या अटकेची मागणी : महापंचायतला निर्णय घेण्यापासून रोखले
वृत्तसंस्था/ रोहतक
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांच्या अटकेची मागणी करणारे कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. ही भेट शनिवारी रात्री उशिरा सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास झाली असून ती सुमारे 2 तासांपर्यंत चालली आहे. खाप पंचायतींकडून केंद्र सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमित शाह यांनी या कुस्तीपटूंना कुठल्याही भेदभावाशिवाय पूर्ण चौकशीचा भरवसा दिला आहे. या कुस्तीपटूंनीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी वेळ मागितला होती असे समजते. यानंतरच ही बैठक झाली असून यात कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्या अटकेची मागणी केली आहे.
या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई होणार आहे. पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना स्वत:चे काम करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा की नको अशी विचारणा शहा यांनी कुस्तीपटूंना केल्याचे समजते.
गृहमंत्री शहा यांच्याशी चर्चा झालयावर बजरंग पुनियाने रविवारी सोनीपत येथील मुंडलाना गावात होणाऱ्या सर्व समाजाच्या महापंचायतला मोठा निर्णय घेण्यापासून रोखले आहे. आज (रविवार) कुठलाच निर्णय घेतला जाऊ नये अशी विनंती गुरनाम चढूनी (शेतकरी नेते) यांन करत आहे. क्रीडापटूंकडून आम्ही एक पंचायत आयोजित करू. त्याचे ठिकाण आम्ही ठरवू, सर्वांना एकत्र ठेवण्याची आमची इच्छा आहे. आमच्या सर्व खाप पंचायती, संघटनांना आम्ही एका व्यासपीठावर आणणार आहोत. 3-4 दिवसांत स्थळ निश्चित करू असे बजरंग पुनिया यांनी म्हटले आहे.
28 मे रोजी दिल्लीत घडलेल्या प्रकारानंतर विनेश अन् साक्षी कोलमडून पडल्या आहेत. आता कुटुंबातील एक सदस्य नेहमी त्यांच्यासोबत असतो, जेणेकरून त्यांनी कुठलेच टोकाचे पाऊल उचलू नये असे बजरंग यांनी म्हटले आहे. या महापंचायतीत कुठलाच निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती चढूनी यांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांचा तपास पूर्ण
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांच्यासंबंधीच्या वादावरून दिल्ली पोलिसांचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. या तपासाचा अंतिम अहवाल तयार झाल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. या अहवालानंतर बृजभूषण यांच्यावरील पॉक्सो अंतर्गत नोंदविण्यात आलेला गुन्हा हटविला जाऊ शकतो. तपास अन् त्याच्या निष्कर्षांपर्यंत आताच कुठलीच टिप्पणी करता येणार नसल्याचे दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा यांनी म्हटले आहे.