हेरगिरीचा करण्यात आला आरोप
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनादरम्यान तेथील प्रसिद्ध लेखक मेहदी बहमन यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मेहदी बहमन यांनी इस्रायलच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती आणि यात त्यांनी इराण सरकारवर टीका केली होती. ही मुलाखत प्रसारित होताच इराणच्या पोलिसांनी बहमन यांना त्वरित अटक केली होती. इराणमध्ये इस्लामिक कायदा लागू करण्याबद्दल बहमन यांनी निंदा केली होती. तसेच इस्रायल आणि इराण यांच्यात संबंध प्रस्थापित करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली होती.
मेहदी बहमन हे इराणमधील प्रख्यात लेखक आहेत. इराणने त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप केला आहे. इराणमध्ये 22 सप्टेंबर रोजी महसा अमिनी या युवतीच्या मृत्यूनंतर हिजाबविरोधी निदर्शने सुरू झाली आहेत. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 500 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये 69 मुलांचाही समावेश आहे. तर इराणचे सरकार निदर्शकांना फासावर लटकवत आहे. इराणमध्ये आतापर्यंत 26 निदर्शकांना फासावर लटकविण्यात आले आहे.