देशाला सामर्थ्यशाली अन् महान करण्याची शपथ ः ली कियांग होणार पंतप्रधान
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनची रबर स्टॅम्प संसद म्हणजेच नॅशनल पीपल्स काँग्रेसने शुक्रवारी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा कार्यकाळ तिसऱयांदा वाढविला आहे. जिनपिंग यांना चीनचा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव 2952 मतांनी संमत झाला आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या एकाही नेत्याने त्यांच्या विरोधात मतदान केलेले नाही. जिनपिंग हे तिसऱयांदा अध्यक्ष होण्याचा मार्ग तसेही ऑक्टोबर महिन्यातच मोकळा झाला होता. तेव्हा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. जिनपिंग आता स्वतःचे विश्वासू ली कियांग यांना चीनचे पंतप्रधान करणार आहेत.
बीजिंग येथे झालेल्या सोहळय़ात जिनपिंग यांनी चीनच्या घटनेवर हात ठेवून शपथ घेतली आहे. यावेळी त्यांनी चीनला सामर्थ्यशाली, समृद्ध, महान समाजवादी देश करण्याचे आश्वासन दिले आहे. अध्यक्षपदाचा तिसरा कार्यकाळ मिळाल्याने जिनपिंग हे माओ यांच्यानंतरचे चीनचे सर्वात शक्तिशाली नेते ठरले आहेत.
चीनला स्वतःच्या सैन्याचा वेगाने विस्तार करावा लागणार आहे. चीनला सामरिक आव्हाने आणि धोक्यांपासून वाचविण्यासाठी पीपल्स लिबरेशन आर्मीला जगातील सर्वोत्तम सैन्य व्हावे लागणार असल्याचे जिनपिंग यांनी संसदेला संबोधित करताना म्हटले आहे.
सैन्यासाठीच्या तरतुदीत वाढ
चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसने मागील आठवडय़ातच संरक्षण अर्थसंकल्पाची घोषणा केली होती. चीन स्वतःच्या संरक्षणाकरता 2023 मध्ये 18 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. भारताच्या संरक्षण अर्थसंकल्पाच्या तुलनेत हा आकडा तीनपट मोठा आहे. चीनने स्वतःच्या संरक्षण खर्चात 7.2 टक्क्यांची वाढ केली आहे. याकरता तेथील कम्युनिस्ट सरकारने बर्हिगत आव्हानांचा दाखला दिला आहे.
जिनपिंग यांच्यासमोरील आव्हाने
कोरोनामुळे मंदावलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणणे, तैवान आणि अमेरिकेसोबतचा तणाव हे 69 वर्षीय जिनपिंग यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. तसेच देशातील बेरोजगारी कमी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. विविध कारणांमुळे जनतेत निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचे आव्हानही त्यांना पेलावे लागणार आहे. चीनविरोधात आता अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी आघाडी उघडली आहे. अशा स्थितीत चीनला अत्यंत संवेदनशील तंत्रज्ञान प्रदान करण्यास पाश्चिमात्य देश नकार आहेत. चीनबद्दल अनेक देशांमध्ये निर्माण झालेला अविश्वास जिनपिंग यांना नुकसानीचा ठरू शकतो.