2014 मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘यारियां’च्या सीक्वेलची प्रतीक्षा संपणार आहे. दिव्या खोसला कुमार हिने 9 वर्षांपूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, परंतु आता दिव्या ‘यारियां 2’ या चित्रपटात अभिनय करताना दिसून येणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत मिजान जाफरी आणि पर्ल व्ही पुरी देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर सादर करण्यात आला असून यात भावाबहिणीचे नाते दिसून येते.
चित्रपटात तीन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा दाखविण्यात आल्या असून त्यांच्यात भावाबहिणीचे नाते जोडले जात असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. दिव्या खोसला कुमारचा हा चित्रपट तीन भांवंडांची कहाणी मांडणारा आहे. तिघांच्या आयुष्याच्या कहाणीला दाखविण्यासाठी निर्मात्यांनी पटकथेत प्रेमाच्या त्रिकोणापासून विनोदाची पेरणी केली आहे. 2014 मध्ये प्रदर्शित चित्रपटात मित्रांची कहाणी दाखविण्यात आली होती. तर दिव्या आता भांवंडांच्या कहाणीसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील ‘सोरे घर’ हे गाणे यापूर्वीच प्रदर्शित केले होते. ‘यारियां 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रु यांनी मिळून केले आहे. तर निर्मिती ही टी-सीरिज या कंपनीकडून करण्यात आली आहे.