इंगळय़ांचा कार्यक्रम उत्साहात : आज लक्ष्मीचा वाढदिवस
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर येथील ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी सायंकाळी चांगळेश्वरी मंदिरासमोर इंगळय़ांचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये हजारोंच्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला. नवस फेडण्यासाठी भाविकांनी इंगळय़ांमधून धावून चांगळेश्वरी मंदिरामध्ये जाऊन पूजा केली. यावेळी हरहर महादेव, चांगळेश्वरी माता की जय अशा जयघोषात भक्तांनी इंगळय़ांचा कार्यक्रम पार पाडला.
सोमवारी रात्री आंबील-गाडय़ांची मिरवणूक काढण्यात आली. यावषी डॉल्बीच्या दणदणाटाने संपूर्ण गाव दणाणले होते. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी या यात्रेला सुरूवात झाली. मंगळवारी सकाळी बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी चांगळेश्वरी मंदिरासमोर इंगळय़ांचा कार्यक्रम पार पडला. सुहासिनींनी मंदिरामध्ये जाऊन ओटी भरणे तसेच तेल घालण्याचा कार्यक्रम केला.
चांगळेश्वरी मंदिराबरोबरच कलमेश्वर मंदिरासमोरही इंगळय़ा झाल्या. त्या ठिकाणी मोठय़ा उत्साहाने भाविकांनी इंगळय़ाचा कार्यक्रम केला. याचबरोबर गावातील इतर मंदिरांनाही भेटी देण्याचा कार्यक्रम झाला. चांगळेश्वरी मंदिराची पालखी काढण्यात आली. त्यानंतर इंगळय़ांचा कार्यक्रम झाला. इंगळय़ांसमोर पूजाअर्चा करण्यात आली. चांगळेश्वरी ट्रस्टचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
बुधवारी लक्ष्मी देवीचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. तर गुरुवारी भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र येळ्ळूर मैदानात या कुस्त्या होणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरील मल्लांच्या या कुस्त्या होणार असल्याने कुस्तीशौकीन मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.