प्रतिनिधी /म्हापसा
पिकेन मरड येथे चहाच्या गाडय़ाला आग लागून स्वयंपाक सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये एक ठार झाला तर गाडा मालक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घडना काल सोमवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली. डेन्सन डिसोजा (वय 40) असे मयताचे नाव तर रेश्मा उस्कईकर असे गंभीररित्या जखमी झालेल्या गाडा मालक महिलेचे नाव आहे. जखमी महिलेला आझिलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी पुजनाची तयारी सुरू असतानाच गाडय़ाला आग लागली व बाजूलाच असलेल्या सिलिंडरने पेट घेतल्याने त्याचा स्फोट झाला. यावेळी तेथे असलेला डेन्सन डिसोझा नामक तरुण आवाजाने बाजूला फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर गाडा मालक महिला रेश्मा उस्कईकर गंभीररित्या जखमी झाल्या आहेत, अशी माहिती घटनास्थळी असलेले सचिन कळंगूटकर यांनी पोलिसांना दिली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. डेन्सनचा मृतदेह चिकित्सेसाठी बांबोळीत गोमेकॉत पाठवून दिला आहे. म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश कान्नाईक, देवेंद्र नाईक, अशोक वळवईकर, वासुदेव ताटे यांनी आग विझविली. या आगीत टि स्टॉलचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.