संतोष सावंत / सावंतवाडी
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी म्हणजे इयत्ता दहावीत असतानाच बॅडमिंटन स्पर्धेत राज्यस्तरावर क्वाटर फायनल पर्यंत मजल मारणारा सावंतवाडी येथील मिला ग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी युसुफ मौनउद्दीन शेख या खेळाडूला खेलो इंडिया तर्फे गोवा राज्यात निवड करण्यात आली आहे. गोवा राज्य सरकारने या विद्यार्थ्याला दत्तक म्हणून स्वीकारले आहे. विशेष म्हणजे इयत्ता दहावीत असतानाच यंदाच्या वर्षी कुमार शेखने हे यश मिळवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकण विभागात कमी वयात बॅडमिंटन स्पर्धेत एका राज्याने दत्तक खेळाडू घेण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे. यंदा झालेल्या दहावीच्या परीक्षेत कुमार शेख याला 86 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. अभ्यास आणि खेळ या दोन्हीमध्ये योग्य सांगड घालत या विद्यार्थ्याने नाविन्यपूर्ण असे यश मिळवले आहे. सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये सेमी मराठी इयत्ता दहावी मध्ये तो शिकत होता. लहानपणापासूनच त्याला बॅडमिंटनची फार आवड , प्रशिक्षक अनिरुद्ध सुमोख चव्हाण या दोन गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे यश मिळवले. तर विशेष मार्गदर्शन एडवोकेट क्षितिज परब व हायस्कूलचे क्रीडा शिक्षक राजेंद्र मोरे, बॅडमिंटन खेळाडू बहीण सानिया शेख ,वडील माजी सैनिक मैनउद्दीन शेख व आई या दोघांनी विशेष मेहनत घेतली. जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव भालचंद्र सावंत यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.