18 लाख 75 हजारांचा शिलकी अर्थसंकल्प; सेंद्रीय शेती, टू व्हिलर चार्जिंग सेंटर, जि.प.प्रयोगशाळा आदी योजनांसाठी तरतूद; 38 कोटी 86 लाखांचे मूळ अंदाजपत्रक मंजूर; 38 कोटी 67 लाखांच्या खर्चाच्या तरतूदी
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हापरिषदेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत सन 2023-24 साठी 38 कोटी 86 लाख 56 हजार 567 रुपयांचे मुळ अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. प्रशासक तथा सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत 18 लाख 75 हजार 212 रूपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. सेंद्रीय शेतीला चालना, बांधकामविषय सर्व मटेरियलची चाचणी प्रयोगशाळा, रमाई वाचनालय, ई बाईक चार्जिंग स्टेशन, समृद्ध शाळा, ओपन जीम आदी नाविन्यपुर्ण योजनांचा या अर्थसंकल्पामध्ये समावेश आहे. अर्थसंकल्पातील बाबी पाहता प्रत्येक योजनांवर अभ्यासपूर्ण तरतूदी केल्याचे स्पष्ट झाले. मुख्यलेखा व वित्त अधिकारी विलास पाटील यांनी अर्थसंकल्प सादर केला. तर विभागप्रमुखांच्या उपस्थितीत प्रशासक चव्हाण यांनी तो मंजूर केला.
जिल्हा परिषद स्वनिधीचे व पाणी पुरवठ्याच्या देखभाल दुरूस्ती निधीचे 2022-23 चे 55 कोटी, 2 लाख 77,792 रूपयांचे अंतिम सुधारीत तर 2023-24 चे 38 कोटी 86 लाख 56,567 रूपयांचे मुळ अंदाजपत्रक शुक्रवारी सादर करण्यात आले. संभाव्य उत्पन्नातून संभाव्य खर्चासाठी 38 कोटी 67 लाख 56, 355 रूपयांची तरतूद केल्याने सुमारे 18 कोटी 75 लाख 212 रूपयांचा हा शिल्लकी मुळ अर्थसंकल्प सादर करण्यात प्रशासकीय विभागाला यश आले आहे.
प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये फारशा नाविन्यपुर्ण गोष्टींचा समावेश नसला तरी ग्रामीण भागातील नागरिकांचा आधुनिक बाबींकडे वाढलेला कल लक्षात घेता अनेक पारंपारिक योजनांना बाजूला करून प्रशासनाने आधुनिक उपकरणे, साहित्य खरेदीचा विचार या अर्थसंकल्पामध्ये केला आहे. सर्वाधिक 5 कोटी 39 लाख 62 हजार इतक्या निधीची तरतूद समाजकल्याण विभागाकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये रमाई वाचनालयास 20 लाख रूपयांची भरीव तरतूद केली आहे. बौद्ध तरूणांनी राज्यघटना, भारतीय संस्कृती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे साहित्यीक वाचन करावे ही त्यापाठीमागची भूमिका आहे. मागासवर्गीय महिलांसाठी रोजगार, शेतीउपयोगी साहित्य खरेदी, विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य खरेदी, कमवा व शिका योजना, व्यायाम साहित्य अशा अनेक गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे. त्यानंतर बांधकाम विभागासाठी 3 कोटी 27 लाख, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागासाठी 3 कोटी 8 लाख, महिला व बालकल्याण विभागासाठी 2 कोटी 83 लाख, शिक्षण विभागासाठी 2 कोटी 58 लाख 47 हजार, दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांसाठी 2 कोटी 56 लाख, पशुसंवर्धन विभागासाठी 1 कोटी 78 लाख, कृषी विभागासाठी 1 कोटी 55 लाख अशी भरीव तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान सर्वसाधारण सभेमध्ये विभागप्रमुखांना आणखी काही सुचवायचे असेल तर त्याचे स्वागत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यानंतर विभागप्रमुखांनी काही बाबींकडे लक्ष वेधून तरतुदीची मागणी केली. त्यालाही पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करण्याचे प्रशासकांनी आश्वासन दिले.
अर्थसंकल्पातील तरतुदी
शिक्षण विभाग- 2 कोटी 58लाख 47 हजार 255
प्राथमिक शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी – 1 कोटी 47 लाख 67 हजार
समग्र शिक्षा अभियान- 20 लाख
विज्ञान प्रयोगाच्या साहित्यासाठी 5 लाख
स्कॉलरशिप सराव परिक्षा- 8 लाख
डॉ. जे.पी.नाईक समृद्ध शाळा- 3 लाख
तात्पुरत्या स्वरूपातील शिक्षकांना मानधन- 20 लाख
आश्रमशाळा, वसतीगृहे-10 लाख
डॉ. विक्रम साराभाई विज्ञान मेळावा- 5 लाख
बांधकाम विभाग – 3 कोटी 27 लाख
बांधकाम चाचणी प्रयोगशाळा खर्च- 43 लाख
रस्ते सुधारणा करणे- 49 लाख 95 हजार
जिपच्या इमारतींचे फायर ऑडीट- 20 लाख
घसारा निधी करीता- 50 लाख
शिवराज्याभिषेक सोहळा समारंभ- 4 लाख
बॅडमिंटन कोर्ट- 4 लाख
जिल्हातील विविध स्मारकांचा विकास- 10 लाख
कृषी विभाग- एकूण तरतूद- 1 कोटी 55 लाख 11 हजार
50 टक्के अनुदानावर सुधारीत औजारे पुरविणे – 43 लाख
50 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना पीव्हीसी, एचडीपीई पाईप- 10 लाख
बायोगॅस बांधकामासाठी- 20 लाख
50 टक्के अनुदानावर भाजीपाला बियाणे किट- 5 लाख
50 टक्के अनुदानावर तृणधान्य बियाणे पुरविणे – 5 लाख
50 टक्के अनुदानावर स्लरी युनिट पुरविणे- 5 लाख
50 टक्के अनुदानावर कडधान्य बियाण्यांसाठी- 5 लाख
लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रिय प्रोत्साहन योजना- 50 लाख
पशुसंवर्धन विभाग- एकूण तरतूद- 1 कोटी 78 लाख 52 हजार
पशुवैद्यकिय दवाखाने, निवास्थाने दुरूस्ती- 46 लाख
आणीबाणीवेळी औषधे, जंतनाशके खरेदी व लसीकरण- 40 लाख
दुग्ध उत्पादन वाढीसाठी 20 लाख
वंध्यत्व निवारण योजनेंतर्गत औषध पुरवठा- 20 लाख
दवाखाना व प्रयोगशाळा बळकटीकरण- 20 लाख
75 टक्के अनुदानावर विधवा, परितक्त्या व दारिद्रय रेषेखालील महिलांना 2 शेळी किंवा 20 तलंगा वाटप- 10 लाख
समाजकल्याण- 5 कोटी 39 लाख 52 हजार
मागासवर्गीय वस्तींमध्ये एलईडी- 28 लाख
समाज मंदिरामध्ये व्यायामाचे साहित्य- 60 लाख
शाहू महाराज मागासवर्गीय विद्यार्थी कमवा व शिका योजना- 15 लाख
रमाई वाचनालय- 20 लाख
मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगारसाठी साधने व उपकरणे-1 कोटी 76 लाख
मागासवर्गीय महिला बचत गटांना यंत्र सामग्री- 1 कोटी
मागासवर्गीयांना स्वयंरोजगारासाठी साधने व उपकरणे- 70 लाख
मागासवर्गीयांना शेती उपयोगी साहित्यासाठी- 30 लाख
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी-20 लाख
दिव्यांग व्यक्तींसाठी कल्याणकारी योजना- 2 कोटी 56 लाख 15 हजार
अपंगत्व प्रतिबंधात्मक योजनांच्या प्रसिद्धीसाठी- 7 लाख
दिव्यांगाचे अपंगत्व घालवण्यासाठी शिबीरे- 10 लाख
दिव्यांग व्यक्तींना विवाहसाठी प्रोत्साहन अनुदान देणे- 21 लाख
दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधने- 1 कोटी 74 लाख
दिव्यांग व्यक्तींना शैक्षणिक साहित्य -20 लाख
आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी खेळाडूंना अर्थसहाय्य – 7 लाख
महिला व बाल कल्याण विभाग- एकूण तरतूद – 2 कोटी 83 लाख
मुलींना (एम.एस.सी.आय.टी.) संगणक प्रशिक्षण- 20 लाख
अंगणवाडी/बालवाडींना साहित्य- 45 लाख
मुलींना व महिलांना व्यवसायिक तांत्रिक प्रशिक्षण- 30 लाख
कुपोषित मुलांना अतिरिक्त आहार पुरविणे- 15 लाख
माता सक्षमीकरण – 10 लाख 30 हजार
स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी पुरविणे- 39 लाख 30 हजार
शिलाई मशीन, पिको फॉल मशीन पुरविणे- 30 लाख
सायकल पुरविणेकरीता अनुदान- 15 लाख 47 हजार
सर्वसाधारण घटकातील महिलांना उद्योगकरीता – 35 लाख
पुरवठा व स्वच्छता विभाग- 3 कोटी 8 लाख 4 हजार
नैसर्गिक झऱ्याच्या भोवती संरक्षक कुंड- 50 लाख
विश्रामगृहे, दवाखाने, आदी सार्वजानिक ठिकाणी विंधण विहीर- 15 लाख
पाटबंधारे विभाग- 40 लाख
बंधारे दुरुस्ती व गाळ काढणे- 40 लाख