वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 1000 बळींचा टप्पा गाठला आहे. इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत सोमवारी लँकेशायर संघाकडून खेळताना अँडरसनने हा टप्पा गाठला आहे.
39 वर्षीय अँडरसन हा इंग्लंडचा अनुभवी आणि प्रभावी वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. लँकेशायर आणि केंट यांच्यातील सोमवारी झालेल्या सामन्यात अँडरसनने केंटच्या कुहेनला झेलबाद केले. अँडरसनचा प्रथमश्रेणी क्रिकेटमधील हा 1000 वा बळी ठरला. या सामन्यात त्याने पाच बळी मिळविले. या शतकामध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 1000 बळी मिळविणारा अँडरसन हा 14 वा गोलंदाज आहे. 2005 साली अँडी कॅडिकने, 2004 साली मार्टिन बिकनेलने, 2002 साली देवॉन माल्कमने आणि 2001 साली वासीम अक्रमने असा पराक्रम केला होता. अँडरसनने इंग्लंडकडून खेळताना 162 कसोटी सामन्यांत 26.67 धावांच्या सरासरीने 617 बळी मिळविले आहेत. 4 ऑगस्टपासून सुरू होणाऱया भारताविरूद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अँडरसनने सरावावर अधिक भर दिला आहे.