प्रतिनिधी/ बेळगाव
अंगडी तांत्रिक व व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये नवी दिल्ली येथील एआयसीटीई व आयएसटीई यांच्या सहकार्याने ‘इंटिग्रेटेड वेस्ट मॅनेजमेंट’ या विषयावर सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्यावतीने ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका डॉ. स्फूर्ती पाटील यांनी केले. भविष्यकाळात कचरा विघटन ही मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे अशा कार्यशाळा कचरा विघटन किंवा कचरा समस्या यावर उपाय शोधण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतील, असे त्या म्हणाल्या.
प्राचार्य आनंद देशपांडे म्हणाले, आजच्या अभियंत्यांनी अशा सामाजिक प्रश्नांवर अधिक अभ्यास करून उपाययोजना शोधणे आवश्यक आहे. कार्यशाळेत एआयसीटीईचे संचालक डॉ. प्रतापसिंग देसाई, आयएसटीईचे प्राध्यापक विजय वैद्य, कर्नाटक आयएसटीईचे माजी चेअरमन प्रा. सुबराय, अधिकारी प्रा. निंगारेड्डी, प्रा. अरविंद जाधव, डॉ. संजय पुजारी, प्रा. सागर बिर्जे आदी उपस्थित होते. कार्यशाळेत पहिल्या सत्रात बेंगळूरचे प्रा. बी. एन. रमेशकुमार यांनी वायू प्रदूषण तसेच बेळगावचे प्राध्यापक डॉ. संगमी यांनी मार्गदर्शन केले.
सिव्हिल विभागाचे प्रमुख प्रा. एम. व्ही. कंठी यांनी स्वागत केले. समन्वयक डॉ. बी. टी. सुरेशबाबू यांनी कार्यशाळेचा हेतू सांगितला. अमर बॅकोडी, प्रा. नूर अहमद, प्रा. विनोद सुळेभावी, प्रा. रवि तिळगंजी, प्रा. गोपाल सुरपल्ली, प्रा. महबूब हंचिनाळ, प्रा. तेजस्विनी जोथावर, प्रा. वैशाली खानापुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजस्विनी यांनी केले. प्रा. विनोद सुळेभावी यांनी आभार मानले.