कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत शिक्कामोर्तब : बसस्थानकात 16 गाळय़ांची उभारणी
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वे स्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचे नूतनीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आले आहे. सदर बसस्थानकाचे हस्तांतर कॅन्टोन्मेंटकडे रखडल्याने स्वच्छतेची समस्या निर्माण झाली होती. मात्र कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत हस्तांतराच्या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून कॅन्टोन्मेंटकडून बसस्थानकाची देखभाल करण्यात येत आहे.
पश्चिम भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या कारवार बसस्थानकाची दुरवस्था झाली होती. येथील गाळय़ांचा दुरुपयोग केला जात होता. प्रवाशांसाठी आसनव्यवस्था नसल्याने उन-पावसात थांबावे लागत होते. मात्र स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बसस्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. बसस्थानकाचा विकास करून आसनव्यवस्था व प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या ठिकाणी 16 गाळे निर्माण करण्यात आले आहेत. पण या बसस्थानकाचे हस्तांतर कॅन्टोन्मेंटकडे करण्यात आले नसल्याने स्वच्छतेची समस्या निर्माण झाली होती. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरली होती.
प्रस्तावाला मंजुरी देवून हस्तांतराच्या मुद्यावर शिक्कामोर्तब
हस्तांतराचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. सदर प्रस्तावाला मंजुरी देवून हस्तांतराच्या मुद्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सदर बसस्थानकाचा ताबा आता कॅन्टोन्मेंटकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटकडून स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे. यापुढे देखभालीची जबाबदारी कॅन्टोन्मेंटची असणार आहे. याठिकाणी 16 गाळे उभारण्यात आले असून सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत.
या गाळय़ांच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंट बोर्डला महसूल मिळणार आहे. त्यामुळे याबाबत कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच लवकरच भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.