वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा सर्वोत्तम टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलची भारतीय टेबल टेनिस फेडरेशनने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
शरथ कमलला 2019 मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले होते आणि हा मान मिळविणारा तो पहिला टेटेपटू बनला होता. जागतिक क्रमवारीत 32 व्या स्थानावर असणाऱया शरथ कमलने राष्ट्रकुल स्पर्धेत अनेक सुवर्णपदके मिळविली आहेत. पण 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सांघिक कांस्यपदक मिळवून देण्याची सर्वोत्तम कामगिरी त्याने केली होती. या स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताने मिळविलेले ते पहिलेच पदक होते. त्याच स्पर्धेत त्याने मनिका बात्रासमवेत मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक पटकावले होते. गेल्या वर्षी शरथ कमलपेक्षा तरुण असलेल्या मनिका बात्राला खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. ‘खेलरत्नसाठी तो योग्य उमेदवार असून यावेळी त्याला हा बहुमान मिळेल, अशी आशा वाटते,’ असे टीटीएफआयचे सल्लागार एमपी सिंग म्हणाले.
शरथ कमलचा माजी सहकारी सौम्यदीप रॉय आता प्रशिक्षकाची भूमिका बजावत असून त्याची दोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे तर अर्जुन पुरस्कारासाठी सुतीर्थ मुखर्जी, ऐहिका मुखर्जी, मनव ठक्कर यांची शिफारस झाली आहे. दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस हॉकीचे जादुगार मेजर ध्यान चंद यांचा वाढदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, त्यावेळी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. प्रत्येक क्रीडा प्रकारात राष्ट्रीय फेडरेशन्सकडून या पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्यात येते. याशिवाय क्रीडापटू स्वतःदेखील या पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकन करू शकतात. 5 जुलै ही नामांकन पाठविण्याची शेवटची तारीख आहे.