मुंबई/प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. कोठडीत असणारे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जबाबात या दोघांची नावं असल्याचा दावा करत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन, सीबीआयकडून चौकशी करा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. अॅड रत्नाकर डावरे यांनी ही याचिका दाखल केली आहे.
दरम्यान सचिन वाझेने केलेल्या निवेदनात “आपल्याला अजित पवार यांच्यावतीने दर्शन घोडावत यांनी महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. राज्यात बेकायदेशीर गुटखा व्यवसाय सुरू आहे. यातल्या ५० बेकायदेशीर गुटखा व्यावसायिक यांच्याकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये प्रमाणे महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते”, असं म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही आपल्याला त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावून त्यांनीही महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करून आणून देण्याचे आदेश दिले होते, असा दावा वाझेने केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
त्यामुळे याचिकाकर्त्यांने सचिन वाझेने केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करुन सीबीआय चौकशी करावी अशी मागणी याचिकेद्वारे कोर्टाकडे केली आहे.