कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना गुन्हेगाराचा ठपका : गोकाक खून प्रकरणाचा शोध अन् बोध, पाच जणांना अटक
बेळगाव : गोकाक येथील उद्योजक राजेश झंवर (वय 53) यांच्या खून प्रकरणाचा तपास रविवारी पूर्ण झाला. गोकाक पोलिसांसाठी गेले दहा दिवस या खून प्रकरणाने मोठे आव्हान निर्माण केले होते. रविवारी आणखी दोघा जणांना अटक झाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 5 वर पोहोचली आहे. या खळबळजनक खून प्रकरणाने अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. शुक्रवार दि. 10 फेब्रुवारीच्या रात्रीपासून राजेश झंवर बेपत्ता होता. कुटुंबीयांनी गोकाक शहर पोलीस स्थानकात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यांच्या मोबाईलवर आलेल्या शेवटच्या कॉलवरून पोलिसांनी प्रकरणाचा तपास हाती घेतला. स्वत: जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली. शेवटच्या संभाषणाच्या आधारावर त्याच गावातील डॉ. सचिन शंकर शिरगावे (वय 36) याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला तपास अधिकाऱ्यांना धक्का बसला. आर्थिक व्यवहारातून आपण राजेशचा काटा काढल्याची कबुली त्याने दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून डॉ. शिवानंद काडगौडा पाटील (वय 28) रा. शिरढाण, ता. हुक्केरी यालाही ताब्यात घेण्यात आले.
डॉक्टरच्या कारमध्ये रक्ताचे डाग आढळले. डॉक्टरने राजेशचा मृतदेह कोळवीजवळ कॅनॉलमध्ये टाकल्याची कबुली दिली. कॅनॉलजवळही रक्ताचे डाग आढळून आले, त्यामुळे पोलिसांची खात्री पटली. मृतदेहाचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले. त्याचवेळेला शाफत इर्शादअहमद त्रासगर (वय 25) रा. गोकाक या तरुणाला बेकायदा गावठी पिस्तुलांच्या तस्करीप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. तपासात उद्योजकाच्या खुनात आपलाही सहभाग असल्याची कबुली त्याने दिली. रविवारी शाफतचा मित्र अबुताला व मोहीन, दोघेही राहणार गोकाक यांना अटक करण्यात आली आहे. बारा दिवसात गोकाक पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या खून प्रकरणाचा तपास करताना गोकाक पोलिसांना जबर मेहनत घ्यावी लागली. केवळ गोकाक तालुकाच नव्हे तर बागलकोट जिल्ह्यातही मृतदेहासाठी शोधमोहीम राबविण्यात आली. यासाठी 125 हून अधिक पोलीस जुंपण्यात आले होते. गुरुवार दि. 16 फेब्रुवारी रोजी पंचनायकनहट्टीजवळ मृतदेह सापडला.
खळबळजनक खून प्रकरणाने अनेक प्रश्न उभे ठाकले
या खळबळजनक खून प्रकरणाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. खरेतर राजेश ऊर्फ राजू झंवर या उद्योजकाच्या खुनाला तसे सबळ कारणच नव्हते. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या सचिन शिरगावे याने टोकाचा निर्णय का घेतला? त्यामागची नेमकी कारणे तरी कोणती आहेत? याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती बरीच माहिती लागली. आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहारातून संपूर्ण जिल्हा हादरवणाऱ्या खुनाचा हा प्रकार घडला आहे.
खुनाला अनेक कारणे असतात. पैसा, जमीन, अनैतिक संबंध, भाऊबंदकी, व्यसनाधिनता, कर्ज अशी कारणांची यादी वाढतच जाते. व्यवहार सुरळीत झाले नाहीत, व्यवहारामधील हेतू स्वच्छ नसेल तर मतभेदाला तोंड फुटते. मतभेदातून ईर्षा, संघर्ष निर्माण होतो. या संघर्षातून एकमेकांना संपविण्याची भाषा सुरू होते. या प्रकरणातही नेमके असेच झाले आहे.
डॉक्टर-उद्योजक यांच्यात छुपा संघर्ष
राजेश झंवर यांनी डॉ. सचिन शिरगावे याला मोठी रक्कम कर्जाऊ दिली होती. त्याच्या बदल्यात डॉक्टरच्या नावे गोकाक येथील मोक्याच्या ठिकाणी असलेली 22 गुंठे जमीन गहाण ठेवून घेण्यात आली होती. आर्थिक व्यवहार आणि त्या बदल्यात गहाण ठेवलेली जमीन यावरून डॉक्टर आणि उद्योजक यांच्यात छुपा संघर्ष सुरू झाला होता. या संघर्षातूनच स्थानिक तरुणांना हाताशी धरून डॉक्टरने उद्योजकाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उद्योजकाला बोलावून घेऊन जेवणासाठी म्हणून सर्वजण बाहेर गेले. कारण डॉक्टर व उद्योजक यांची मैत्रीही होतीच. पैशाच्या बदल्यात घेतलेली जमीन परत मिळविण्यासाठी उद्योजकाचा काटा काढण्यात आला. पैसा आणि जमिनीसाठी सुरू असलेल्या संघर्षात उद्योजकाचा तर बळी गेलाच शिवाय प्रतिष्ठित डॉक्टरलाही गजाआड व्हावे लागले.
22 गुंठे जमिनीसाठी उद्योजकाला पाण्यामध्ये समाधी
पैसा, जमीन आदी कारणांसाठी माणूस एकदा गुन्हेगार बनला तर त्याचा गुन्हेगारी प्रवास सुरू होतो. देवाणघेवाण आणि चर्चेने संपविता येईल, अशा व्यवहारातून उद्योजकाचा बळी गेला. दोन डॉक्टरसह पाच जणांना अटक झाली आहे. खुनाचा उलगडा होऊ नये, मृतदेह लवकर सापडू नये याची काळजी घेण्यासाठी खुनानंतर उद्योजकाचा मृतदेह पीपीई किटमध्ये गुंडाळून पॅनॉलमध्ये फेकण्यात आला. 22 गुंठे जमिनीसाठी अडून बसलेल्या उद्योजकाला शेवटी वाहत्या पाण्यामध्ये समाधी देण्यात आली. आपापल्या व्यवसायांमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर आणि उद्योजक हे तिघेजण कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नव्हते. आता मात्र त्यांच्यावर गुन्हेगारीचा ठपका बसला आहे.