प्रतिनिधी/ पणजी
2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारात स्वतः मंत्री राहून सत्ता उपभोगलेले पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी भाजपवर टीका करणे बंद करावे, अन्यथा त्यांच्याही भानगडी आम्ही उघड करू शकतो याची जाणीव ठेवावी, असा इशारा सुकूरचे सरपंच संदीप वझरकर यांनी दिला आहे.
शुक्रवारी विधानसभेत बोलताना खंवटे यांनी भाजपला वॉशिंग मशीन संबोधत निर्भत्सना केली होती, त्यामुळे संतप्त बनलेले वझरकर पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, उत्तर गोवा भाजप पदाधिकारी महानंद अस्नोडकर, सुकुरचे पंचसदस्य संदीप मांद्रेकर, किर्ती कुडणेकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
रोहन खंवटे हे याच वॉशिंग मशीनमधून दोनदा धुवून निघाले आहेत. परंतु त्यांच्या अंगावरील चिखल स्वच्छ झाला नाही. त्यामुळे आता ते वैफल्यग्रस्त बनले असून बेताल वक्तव्ये करत आहेत, असे वझरकर म्हणाले. सुकूर पंचायत परिसरात 2017 मध्ये अनेक बेकायदेशीर घरांना क्रमांक देण्यात आले होते. ते सत्य आहे. मात्र त्यावेळी स्वतः खंवटेच मंत्रीपदी होते. अशावेळी त्यांनी स्वतः कुणावरही कारवाई का केली नाही? आता त्यांना कुणाचा पुळका आलेला आहे म्हणून ते आरोप करत आहेत? असा सवाल वझरकर यांनी उपस्थित केला. तसेच हे प्रकार आजही चालूच आहेत, आणि त्यात स्वतः खंवटेच गुंतलेले आहेत, असा दावाही त्यांनी केला.
खंवटे यांना केवळ सुकूरमधीलच बेकायदेशीरपणा दिसतो. या मतदारसंघात साल्वादोर द मुन्द आणि पेन्ह द फ्रान्स या अन्य दोन पंचायतीही आहेत. तेथे मोठय़ा प्रमाणात झोपडय़ां बांधण्यात आल्या आहेत. मानशी चालविणाऱयांवर हल्ले होत आहेत, वाहनांना आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत, एवढेच नव्हे तर माणसांना पेटवूनही देण्यात आले आहेत, हे बेकायदेशीर प्रकार नव्हे का? असे अनेक सवाल वझरकर यांनी उपस्थित केले. सुमारे 10 वर्षे आपण त्यांच्या सोबत होतो. त्या काळात त्यांच्याही अनेक मोठमोठय़ा भानगडी जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे खंवटे यांनी तोंडाला आवर घालावा. आज आम्ही जे काही बोलत आहोत ती केवळ झलक आहे. नाटकाचा पहिला अंक आहे. दोन अंक अद्याप बाकी आहेत. असा इशारा त्यांनी दिला.
कार्तिक कुडणेकर यांनी बोलताना खंवटे यांची मानसिकता अद्याप भाटकारशाहीचीच आहे. तरीही कित्येक वर्षे आम्ही त्यांना साथ दिली. प्रचारकार्यात सहभाग घेतला. परंतु खंवटे आता लोकांमध्ये भांडणे लावत आहेत, फूट घालू पाहात आहेत. आम्ही केलेले उपकार तर ते कधीच विसरले आहेत, खंवटे आता सरडय़ाप्रमाणे रंग बदलत आहे. अशा व्यक्तीपासून मतदारांनी सावध राहावे. पुढील निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन कुडणेकर यांनी केले. आमच्यावर बेकायदेशीरपणाचा आरोप करणाऱया खंवटे यांनी आम्ही कुठे बेकायदेशीरपणा केला त्याचा एक तरी पुरावा द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले.